नाशिक – नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून संघर्षाने आणि जिद्दीने राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणारा महाराष्ट्र संघाचा तिरंदाजी या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू अर्जुन सोनवणे (२०) याचा राजस्थानातील कोटा रेल्वे स्थानकात रेल्वेतून उतरताना फलाट आणि गाडी यांच्यातील फटीत सापडून मृत्यू झाला.
पंजाबमधील भटिंडा येथे तिरंदाजीच्या आंतरविद्यापीठीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्जुन हा टीमसह गेला होता. स्पर्धेनंतर टीम शकूर बस्ती-मुंबई सेंट्रल रेल्वेने एसी स्पेशल डब्यातून मुंबईला परत येत होती. ही रेल्वे शनिवारी रात्री ८:४५ वाजता कोटा जंक्शन स्थानकात पोहोचली. यावेळी पिण्याचे पाणी घेण्यसाठी अर्जुन सोनवणे रेल्वे गाडीचा वेग काहीसा कमी झाल्यावर चालत्या गाडीतून उतरु लागला. त्यावेळी तो पडला. रेल्वेगाडी आणि फलाट यांच्यात असणाऱ्या फटीत तो अडकला.
गंभीर दुखापत झाल्याने त्याला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात रात्री त्याचा मृत्यू झाला. रविवारी त्याचे नातेवाईक कोटा येथे पोहचल्यावर त्यांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. सोमवारी सकाळी खेडगाव येथे अर्जुनवर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी त्याच्याबरोबर सराव करणारे खेळाडू आणि सहकाऱ्यांना अश्रु अनावर झाले होते.
अर्जुन सोनवणे हा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत होता. पंजाबमधील गुरु काशी विद्यापीठात तिरंदाजी स्पर्धेसाठी अर्जुन बहीण दीक्षा हिच्याबरोबर दहा दिवसांपासून गेला होता. पाच वर्षांपासून अर्जुन आणि त्याची बहीण दीक्षा तिरंदाजीचा सराव करीत होते. अर्जुनमध्ये तिरंदाजीत काहीतरी वेगळे करुन दाखवण्याची ईर्षा होती. राज्य आणि राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धांमध्ये त्याच्या नावावर आठ सुवर्णपदकांची नोंद आहे.
२०२२ मधील कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत संघाला सुवर्णपदक, २०२२ मध्येच उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत संघाला रौप्यपदक, २०२१ मधील उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत संघाला कांस्यपदक मिळाले होते. या कामगिरीत अर्जुनचा मोलाचा वाटा राहिला. २०१९ मधील उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत त्याला तीन सुवर्णपदके मिळाली होती.
अर्जुनकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची क्षमता होती. अधिकाधिका चांगली कामगिरी करण्याची मनिषा होती. प्रतिक थेटे यांच्याकडे त्याने प्रशिक्षण घेतले होते. अर्जुनच्या अशा अपघाती मृत्युमुळे प्रतिक थेटे यांनी तसेच नाशिक जिल्हा तिरंदाजी संघटनेच्या सचिव मंगला शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अर्जुनबरोबर प्रशिक्षण घेणारे सहकारी, त्याचे मित्र यांना अर्जुनचा असा अपघाती मृत्यू होणे, हे अजूनही सहन करण्यापलिकडचे झाले आहे.
आपला एक सहकारी आपल्याला सोडून गेल्याच्या धक्क्यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. अर्जुनबरोबर कायमच त्याचे वडील कोणत्याही स्पर्धेच्या ठिकाणी जात असत. परंतु, यावेळी त्यांचे जाणे झाले नाही. अर्जुन अभ्यासातही हुषार होता. स्वभावाने शांत असलेल्या अर्जुनच्या जाण्याचे शिक्षकवर्गही हळहळले.
