जळगाव : जिल्ह्यातील वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील देवझिरी- हंड्याकुंड्या- पाटी रस्त्यावर गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाला वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळून आली असून सागवान लाकडासह दोन लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लाकूड तस्करांचा शोध घेतला जात असल्याचे चोपडा येथील सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांनी सांगितले.

 देवझिरीचे वनक्षेत्रपाल जी. आर. बडगुजर हे हांड्याकुंड्या वनपरिक्षेत्रातील जवान, वनमजूर, वनसेवकांसह देवझिरी-हंड्याकुंड्या-पाटी रस्त्याने गस्त घालत असताना हंड्याकुंड्या नाल्यापासून पूर्वेस ४०० मीटर अंतरावरील वनखंड क्रमांक १६६ क्षेत्रात तीन ठिकाणी अवैध वृक्षतोड आढळून आली. त्यात साग लाकडासह सुमारे दोन लाख ६६ हजार ८५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या परिसरात सशस्त्र जवानांची गस्त वाढविण्यात आली असून, अवैध वृक्षतोड करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक वनसंरक्षक हाडपे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> बागलाणमध्ये शेतीला दिवसा वीज मिळण्याचा मार्ग प्रशस्त; ११०० एकरवर सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनखंड क्रमांक १६६ या देवझिरी वनक्षेत्रास १६ किलोमीटरच्या उत्तरेस मध्य प्रदेशची सीमा अआहे. नियतक्षेत्र देवझिरी पूर्वमधील घटनास्थळापासून सुमारे ४०० मीटरवर उत्तरेस मध्य प्रदेशची सीमा असल्याने संशयितांना पसार होण्यास अथवा पळून जाण्यास सोयीचे होते. अवैध वृक्षतोडीची पाहणी केली असून, संशयितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. भविष्यात पुन्हा असा गुन्हा होणार नाही यासाठी कठोर कारवाई केली जाईल. वनगुन्ह्यांचा हा प्रकार अवैध वृक्षतोड तस्करी व अवैध अतिक्रमण रोखण्यात आल्यामुळे सूडबुद्धीने केल्याचे दिसून येत आहे. या गुन्ह्याची सखोल चौकशी व संशयितांचा शोध यावल येथील उपवनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देवझिरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल करीत आहेत. अवैध वृक्षतोड परिसरात राज्य राखीव पोलीस दलाचे गट क्रमांक सहाचे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत, असेही हाडपे यांनी सांगितले.