धुळे – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन मोहीम राबवली. या मोहिमेत सहा बंदुका, आठ जिवंत काडतुसे, १६ तलवारी, कोयता, गुप्ती असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तसेच गावठी दारु, विदेशी दारु, गांजा, गुटखा अशा अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना बेड्या ठोकण्यात आल्या. एकूण १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे जिल्हाभरात एकाच वेळी गुन्हेगारीवर आणि अवैध धंद्यांवर मोठा प्रहार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर वाहतूक शाखा यातील कर्मचार्‍यांना विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात नाकाबंदी तसेच तपासणीचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार २२ ऑक्टोबरच्या सायंकाळपासून २३ ऑक्टोबर रोजी पहाटे तीनपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदीसह छापे टाकण्यात आले. या कारवाईत शस्त्रे आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले, असे पोलीस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले. विनापरवाना गावठी बंदूक बाळगणार्‍या सहा संशयितांना पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी नगरातून अशोक चौधरी (३२) याला पकडून त्याच्याकडून तीन बंदुका आणि तीन काडतूसे हस्तगत केली. शहर पोलिसांनी शेख नशीर (रा. शंभरफुटी,रोड) याच्याकडून बंदूक आणि दोन काडतूसे जप्त केली. चाळीसगाव रोड पोलिसांनी विश्‍वजीत चौगुले (रा. पवननगर) याला पकडून बंदूक जप्त केली. शिरपूर तालुका पोलिसांनी तिघांना पकडले. त्यात अब्दुलाखान पठाण (रा. दांडेली, कर्नाटक), संजय पावरा (रा. भोईटी, ता. शिरपूर), ईराम सेनानी (रा. मध्य प्रदेश) यांच्याकडून बंदूक आणि दोन काडतूसे जप्त केली. एकूण चार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>नाशिक मध्य जागेवरुन भाजप, शिवसेनेत रस्सीखेच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहशत माजविण्याच्या उद्देशाने विनापरवाना तलवार बाळगणाऱ्या ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून १६ तलवारी, कोयता आणि गुप्ती जप्त केली. यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक चौधरी (रा. वनश्री कॉलनी, मोहाडी) याला पकडले. तसेच आझाद नगर पोलिसांनी मोहम्मद रशीद (रा. माधवपुरा, धुळे), तालुका पोलिसांनी सचिन बागूल (रा. मोराणे), महेंद्र मोरे (रा. आनंदखेडा, शिरपूर), शहर पोलिसांनी चरण नारडे, संजय मोतिंगे, रमेश गोमलाडू (रा. सिरसगाव, जि.छत्रपती संभाजी नगर) यांना पकडून चार तलवारी हस्तगत केल्या. दोंडाईचा पोलिसांनी जट्ट्या उर्फ रोहिदास कोळी याला तलवारीसह पकडले. पश्‍चिम देवपूर पोलिसांनी अमर राजू वाघमारे (रा. बाबासाहेब आंबेडकरनगर, नकाणे रोड) आणि पंकज गवळी (रा. मोगलाई, गवळीवाडा) या दोघांकडून चार तलवारी जप्त केल्या. देवपूर पोलिसांनी गौरीशंकर उर्फ गजानन धुर्मेकर (रा. सावकार पुतळ्याजवळ) याच्याकडून कोयता जप्त केला. आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.