नाशिक – नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक शहरासह जिल्हा, उत्तर महाराष्ट्र तसेच ठाणे, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतील. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने भाविकांना सुखकर दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील यांनी दिली.
नवरात्र उत्सव काळात पावसापासून संरक्षणासाठी मंदिर परिसरात संपूर्ण जलरोधक मंडप उभारण्यात येणार असून दोन्ही प्रवेशद्वारांवर स्वतंत्र ये-जा करण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिर परिसरात ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिर संस्थानने स्वतःची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा उभी केली असून महिला आणि पुरुष बाउन्सर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्सवाच्या काळात येणाऱ्या सर्व भाविकांचा दोन कोटी रुपयांचा सामूहिक विमा काढण्यात येणार असून, देवीच्या दागिन्यांसाठी एक कोटी रुपयांचा विमा तसेच सेवेकऱ्यांसाठीही विमा कवचाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात मंदिर २४ तास खुले राहणार असून दररोज पहाटे ३.३० वाजता काकड आरती आणि रात्री १२ वाजता महाआरती होणार आहे. श्री कालिका यात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून सहा ऑक्टोबर म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे.
स्वच्छतेसाठी १०० महिला स्वयंसेविका (बचत गटांमार्फत) आणि १०० पुरुष स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दर्शनासाठी महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग राहणार आहे. आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, मंदिर परिसरात सहाय्यता व मदत केंद्र कार्यरत राहणार आहे. याशिवाय सिव्हिल डिफेन्सचे स्वयंसेवक, गृहरक्षक, पोलीस, २४ तास अग्निशमन पथक, कर्मचारी आणि २४ तास जनरेटर सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी ‘देणगी दर्शन’ अर्थात तत्काळ दर्शनाची विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या संपूर्ण नवरात्रोत्सवात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. या नियोजन बैठकीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, विश्वस्त आबा पवार, माजी नगरसेवक दत्ता पाटील, किशोर कोठावळे आदी उपस्थित होते.
उत्सव काळासाठी नियोजन
नवरात्रोत्सव काळात मंदिर २४ तास खुले राहणार असून दररोज पहाटे ३.३० वाजता काकड आरती आणि रात्री १२ वाजता महाआरती होणार आहे. यात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून सहा ऑक्टोबर २०२५ पर्यंत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. नवरात्र उत्सवासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आदिवासी विकास भवनसमोरील रस्ता वाहनांसाठी बंद ठेवावा, अशी सूचना करण्यात आली आहे. मंदिर आवारात विद्युत व्यवस्थेसाठी दोन जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे .छात्रसेनेचे विद्यार्थी मदतीसाठी राहणार आहेत. उत्सव काळात रक्तदान शिबीर सुरु राहणार आहे. देणगी दर्शनसाठी १०० रुपये शुल्क असून अपंग तसेच वृद्ध लोकांना व्हीलचेअर ची सुविधा ठेवण्यात आली आहे. प्रसादाच्या दुकानदारांना प्लास्टिक बंदीचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.