जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जुने निष्ठावान नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी यांनी मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला.
जळगाव जिल्ह्यातील दोन माजी मंत्री तसेच तीन माजी आमदारांनी विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी हे देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही जळगाव दौऱ्यावर असताना जाणाऱ्यांना जाऊ द्या म्हणत त्यावेळच्या चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला होता. मात्र, त्यावेळी स्वतः गुजराथी यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मला आजवर भरपूर काही न मागता दिले आहे. त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचा किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. आता मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कोणत्याही पक्षात असले तरी, मी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार असल्याचे म्हटले होते.
प्रत्यक्षात, मंगळवारी गुजराथी यांनी शरद पवार गटाची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांच्या बरोबर घनःश्याम पाटील, चंद्रहास गुजराथी यांच्यासह चोपडा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, गुजराथी यांचा चोपडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून दांडगा जनसंपर्क राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आतापर्यंत बऱ्याच निवडणुका जिंकल्या आहेत.
अजित पवार गटात यांचाही प्रवेश
ॲड. घनश्याम पाटील, इंदिराताई पाटील, चंद्रहास गुजराथी, सुनील जैन, अनिल साठे, गोकुळ पाटील, डी. पी. पाटील, शशिकांत पाटील, शशिकांत देवरे, दिनेश देशमुख, कांतीलाल पाटील, कल्पना दिनेश पाटील, कल्पना यशवंत पाटील, भूपेंद्र गुजराथी, विनायक पाटील, सुनील पाटील, नंदकिशोर पाटील, ललित बागुल, प्रल्हाद पाटील, श्यामसिंग परदेशी, समाधान माळी, प्रफुल्ल स्वामी, मकसूद पठाण, नईम शेख, साखरलाल महाजन.
