लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार: धडगाव आणि तळोदा तालुक्याला जोडणाऱ्या चांदसैली घाटात गॅबियन व संरक्षक भिंत उभारण्याचे काम करण्यात येणार असल्याने २८ जुलै ते २८ ऑगस्ट या महिनाभराच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता घाटातील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. डोंगराळ परिसरात पावसामुळे किंवा भूस्खलनामुळे सदरच्या परिसरात घाटातून मोठ्या प्रमाणावर दगड व माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर मार्गावर धोकादायक वळणावर तसेच आवश्यक त्या ठिकाणी गॅबियन, संरक्षण भिंत करण्यासाठी या मार्गावरील अत्यावश्यक सेवा देणारी वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतूक बंद राहील.

रोषमाळ-कोठार-तळोदा चांदसैली घाटातून होणारी वाहनांची वाहतूक बंद करून ती इतर मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी जारी केले आहेत. या मार्गावर फक्त अत्यावश्यक सेवेच्या रूग्णवाहिका, अग्निशमन, गॅस सिलिंडर वाहतूक, अन्न व धान्य वितरण या सारख्या वाहनांसाठी वाहतूक सुरू राहिल. या मार्गावर उप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिशा दर्शक फलक आणि अडथळे उभारून वाहतूक वळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून आवश्यकते नुसार पथकेही नियुक्त करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा… वांगण बारीतून वाहतूक पूर्ववत; दरडसह चिखल हटविण्यात यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील वर्षी देखील हा घाट दुरुस्तीसाठी अशाच पद्धतीचे आदेश देण्यात आले होते. मात्र निधीची तरतूदच झाली नसल्याने घाट दुरुस्ती न झाल्याने वर्षभरात या घाटाची अधिकच दुरावस्था झाली आहे. आता या घाटाच्या दुरुस्तीला निधी मिळाल्याने निविदा प्रकीया देखील झाली असल्याने अखेर प्रशासनाने घाटाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.