नाशिक – रद्द केलेली पदे परत आणा, बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्ती निर्णय रद्द करा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र आश्रमशाळा कंत्राटी कर्मचारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांनी १३ दिवसांपासून येथील आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या दिला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आंदोलकांची दुसऱ्यांदा भेट घेतली. बुधवारी मुंबईत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येणार असून यामध्ये सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आंदोलनस्थळी आतापर्यंत झिरवळ, आ. हिरामण खोसकर, आ. नितीन पवार, माजी आमदार जे. पी. गावीत, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, मनसेचे दिनकर पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली आहे. आंदोलकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांच्यापुढेही मागण्या मांडल्या. अधिवेशनात या आंदोलनाविषयी चर्चा झाली असता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्यांना कामावर रुजू करण्यात आल्याचे सांगितले.
दुसरीकडे मंत्र्यांनी चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. कळवण येथील शिक्षिका रुपाली करांडे यांनी, आपण १४ वर्षांपासून काम करत असल्याचे सांगितले. पती शेतीची कामे करतात. मुले आश्रमशाळेत शिकत आहेत. संबंधित विभागाने तासिका तत्वावर घेतले आहे. शिक्षण बी.एस्सी, बी.एड आहे. अजून मंत्र्यांना कोणती पात्रता हवी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
झिरवळ यांनी दुसऱ्यांदा आंदोलकांची भेट घेतली. दरम्यान, आंदोलकांना धान्य स्वरूपात मदत येत आहे. कुटूंबियांकडूनही धान्य दिले जात आहे. रस्त्यावरच तीन दगडाची चूल मांडत जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.