नाशिक – देशांतर्गत कमी होत असलेली मागणी, अपेक्षित निर्यात न होणे, श्रावणातील उपवास, चातुर्मास याची परिणती स्थानिक कांद्याच्या दरावर होत आहे. काही दिवसांत कांद्याचे प्रति क्विंटलचे सरासरी दर २०० ते २५० रुपयांनी घसरले. या प्रश्नी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लासलगाव येथे बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.
जुलैच्या मध्यावर कांद्याला दीड हजार रुपये दर होता. उन्हाळ कांद्याचा हंगाम सुरु झाल्यापासून सरासरी दर एक ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत. यंदा उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असून जुलैअखेरपर्यंत बाजारात आवक टिकून आहे. परंतु, दर वाढले नाहीत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत एकूण १० हजार ६४६ क्विंटलची आवक झाली. त्यास किमान ६००, कमाल १७४० तर सरासरी १३०१ रुपये दर मिळाला. पंधरवड्यात दरात २०० ते २५० रुपयांनी घसरण झाली.
दक्षिणेकडील राज्यातून स्थानिक कांदा बाजारात येऊ लागल्याने देशांतर्गत मागणी कमी होत आहे. चातुर्मासात अनेक जण कांदा खात नाहीत. श्रावण महिन्यातील उपवासात तो भोजनापासून दूर असतो. बांगलादेशमध्ये निर्यात बंद आहे. कांदा दरावर हे घटक परिणाम करणारे ठरत असल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.
कांदा उत्पादक संघटनेचा आग्रह
राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याचे दर अतिशय कमी झाले असून या बाजारभावात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनीच लासलगाव येथे विशेष बैठक घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. या बाबतचे पत्र संघटनेने लासलगाव बाजार समितीला दिले. घसरलेल्या दरामुळे उत्पादकांचे नुकसान होत आहे.
सरकारने त्वरित हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाही स्वतंत्रपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृतरित्या लासलगाव बाजार समितीत बैठक घेण्याचा आग्रह धरणार आहे. या बैठकीत कांदा दर स्थिरीकरण, किमान आधारभूत किंमत निश्चित करणे, साठवणूक व निर्यात धोरण, कांदा प्रक्रिया उद्योग व स्वतंत्र कांदा महामंडळाची स्थापना आदी विषयांवर तत्काळ निर्णय घ्यावेत, असे संघटनेचे म्हणणे आहे.
लासलगावसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी येऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधावा, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, जिल्हा अध्यक्ष जयदीप भदाणे, केदारनाथ नवले आदींनी केली.