Municipal Election 2025 धुळे – जिल्हा परिषद आणि धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्ष स्वतंत्ररित्या लढणार की आघाडी आणि युती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार, याविषयी अजूनही संभ्रम आहे.राज्यात महायुती दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांची प्रथमच निवडणूक होत आहे. त्यामुळे महायुतीसाठी येणाऱ्या निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम आयोगातर्फे राबविण्यात येत आहे. याअनुषंगाने धुळे जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची रचना, धुळे महानगरपालीकेची वार्ड रचना व आरक्षण निश्चित करण्यात आले असून जिल्हयातील नगरपालिका निवडणूका लवकरच होणे अपेक्षित आहे. हत्ती ही निशाणी असलेला बहुजन समाज पक्ष हा राष्ट्रीय आणि मान्यताप्राप्त असून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारींबरोबरच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड..सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहेत. धुळे जिल्हयातील जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती आणि महानगरपालिकां निवडणुकीत बहुजन समाज पक्ष सर्वच्या सर्व जागा लढविणार आहे. यासाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये अद्यावत मतदार याद्या तयार करण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरु असून त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. मतदार नोंदणी करतांना पारदर्शकता यावी म्हणून संबंधित मतदार नोंदणी केंद्रावर बहुजन समाज पक्षाचे प्रतिनिधी लक्ष ठेवणार आहेत. ही जबाबदारी सोपविण्यात आलेल्या प्रतिनिधीला निवडणूक आयोगाचे ओळखपत्र (आयडी कार्ड) देण्यात येणार आहे.
ज्या कार्यकर्त्यांना मतदार नोंदणी केंद्रावर प्रतिनिधी म्हणून काम करावयाचे आहे, त्यांनी बहुजन समाज पक्ष धुळे जिल्हा युनिटचे जिल्हा मतदार नोंदणी प्रतिनिधी यांच्या मार्फत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याकामी पक्षाचे नाशिक क्षेत्र प्रभारी राज चव्हाण, जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल शिरसाठ, धुळे जिल्हा प्रभारी विशाल ढिवरे, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, विधानसभा धुळे अध्यक्ष विक्रम जगताप, जिल्हा महासचिव आसीफ मन्सुरी, जिल्हा सचिव महेंद्र समुद्रे यांच्याशी संपर्क साधावा. आगामी काळात व्यापक जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रभारी विशाल ढिवरे यांनी दिली आहे.