नाशिक : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची ३२५ वी जयंती सोमवारी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील डुबेरे या त्यांच्या जन्मगावी अनोख्या पद्धतीने साजरी करण्याची तयारी मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या दिवशी सकाळी भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या बँड पथकासह सुमारे दीडशे विद्यार्थी डुबेरे गावात संचलन करतील. नंतर बर्वे वाड्यातील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून मानवंदना दिली जाणार आहे. या सोहळ्यात महाविद्यालयाचे मानवंदना देणारे सशस्त्र पथकही सहभागी होणार आहे.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची ३२५ वी जयंती त्यांच्या जन्मगावी डुबेरे येथे १८ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. या निमित्त सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भोसला सैनिकी महाविद्यालयाने यंदा जयंती उत्सवाला भव्य स्वरूप देण्याचे नियोजन केले आहे. या बाबतची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर विक्रांत कावळे (निवृत्त) यांनी दिली. १८ ऑगस्ट १७०० या दिवशी बर्वे वाड्यात बाजीराव यांचा जन्म झाला होता. त्यांच्या आईचे नाव राधाबाई बर्वे होते. या कुटुंबाचे नववे वंशज चंद्रशेखर बर्वे संस्थेच्या संपर्कात आहे. त्यांच्या माध्यमातून हा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे प्राचार्य कावळे यांनी सांगितले.
दीड एकर क्षेत्रात असणाऱ्या बर्वे वाड्याच्या प्रांगणात थोरले बाजीराव यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. हिंदवी साम्राज्याचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे अजिंक्य योद्धा होते. अलीकडच्या काळात अजेय वीर विस्मरणात जात आहेत. त्यामुळे अशा वीर योद्ध्यांचा कधीही विसर पडू नये, अटकपासून कटकपर्यंत झेंडा रोवणाऱ्या योद्धाची कायमस्वरुपी आठवण रहावी, यासाठी भोसला सैनिकी महाविद्यालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्य कावळे यांनी नमूद केले.
चंद्रशेखर बर्वे यांच्याकडून मार्गदर्शन
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंतीनिमित्त डुबेरे गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भोसला सैनिकी महाविद्यालयाचे बँड पथक, दोन तुकड्या (प्लॅटून) आणि मानवंदना देणारे सशस्त्र पथक असे साधारणत: १५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन हे विद्यार्थी डुबेरे गावात बँड पथकासह संचलन करून बर्वे वाड्यात जातील. तिथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सलामी दिली जाईल. त्यानंतर मंदिराच्या सभागृहात चंद्रशेखर बर्वे हे थोरल्या बाजीरावांविषयी माहिती देणार असल्याचे भोसला सैनिकी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर विक्रांत कावळे (निवृत्त) यांनी सांगितले.