कुकुंबर मोझियाक व्हायरस अर्थात सीएमव्ही रोगामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना धडकी भरली आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, लवकरच या शेतकर्यांना भरपाई मिळणार आहे. मंत्री पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी ५८ कोटींच्या तरतुदीचा प्रस्ताव सादर केला असून, यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा- नाशिक: गणेशोत्सवातील वीज दरावरून वाद; देयके न भरण्याचा मंडळांचा पवित्रा
जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक असणार्या केळीवर सध्या कुकुंबर मोझियाक व्हायरस अर्थात सीएमव्ही या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हा रोग झाल्यानंतर संपूर्ण शेतातील पीकच काढून फेकावे लागते. तो रोग संसर्गजन्स असून, यामुळे केळी उत्पादक धास्तावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौर्यावर आले असताना २० सप्टेंबर रोजी पालकमंत्री पाटील आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याकडे केळी उत्पादकांची व्यथा मांडली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सीएमव्हीग्रस्त शेतकर्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली होती. या अनुषंगाने २१ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीएमव्हीग्रस्त शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते, तसेच नुकसान झालेल्या शेतकर्यांना ११ रुपये प्रतिरोप या सवलतीच्या दरात टिश्युकल्चर रोपे उपलब्ध करण्यात येतील, असा निर्णयही घेण्यात आला होता.
हेही वाचा- नाशिक: दिवाळी निमित्त जिल्ह्यातून सहाशेहून अधिक बससेवेचे नियोजन
दरम्यान, यानंतर करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील २७५ गावांमधील १५ हजार ६६३ शेतकर्यांना सीएमव्ही रोगाचा फटका बसल्याचे दिसून आले. यामुळे एकूण आठ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. यात एकूण ११ रुपये प्रतिरोप या मूल्यानुसार तीन कोटी ८९ लाख ७७ हजार ६५७ रोपांचे एकूण ४२ कोटी ८९ लाख ५४ हजार २३१ रुपये इतके अनुदान देय आहे, तर १५ रुपयांच्या सरासरी दरानुसार याचे मूल्य ५८ कोटी ४६ लाख ६४ हजार ८५५ रुपये इतके अनुदान देय आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.