नाशिक – देशात भाजपकडून हिंदू-मुस्लिम यांच्यात व्देष पसरवून अस्थिरता निर्माण केली जात आहे. प्रत्येक प्रश्नाकडे हिंदू – मुस्लिम म्हणून बघितले जात असन त्यास मुस्लिमद्वेषी किनार दिली जात आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डाॅ. भालचंद्र कांगो यांनी केला.

येथे आयोजित भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनात डाॅ. कांगो यांना सोमवारी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक काॅम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रुपये ५१ हजार, स्मृतीचिन्ह, शाल असे आहे. यावेळी कांगो यांनी, पक्षाचे किती खासदार, आमदार ही आपली ओळख नसून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत संघर्ष करणे ही ओळख असल्याचे लक्षात आणून दिले. आपण संघर्ष करणे सोडल्याने मागे पडत आहोत. अन्याय-अत्याचार जोपर्यंत आहे. तोपर्यंत पक्षाला मरण नाही. भाकपने संविधानाचा गाभा पकडला आहे. कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न आपले प्रश्न म्हणून लढले पाहिजे. महिलांचे प्रमाण पक्षात कमी आहे. ते वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे त्यांनी नमूद केले.

कसबे यांनी मार्क्सवाद तसेच कम्युनिस्ट पक्ष याविषयी माहिती देतांना माणसाचे माणुसपण जपले गेले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम भस्मे होते व्यासपीठावर भाकपच्या राष्ट्रीय सचिव अमरजीत कौर, ॲड. साधना गायकवाड, सुभाष लांडे,राजू देसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डाव्यांविरोधात भाजपचा खोटा प्रचार – कुमार केतकर

भाकप राज्य अधिवेशनात माजी खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. डावी चळवळ देशात कमकुवत झाल्याचे भाजप आणि संघाकडून बिंबविले जात आहे. डाव्या विचारांची भीती वाटत असल्यानेच त्यांच्याकडून असा खोटा प्रचार करण्यात येत आहे. भाजपविरोधात डाव्यांना पुन्हा संघर्ष करावा लागेल, असे केतकर यांनी सांगितले.