जळगाव – जिल्ह्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना, भुसावळ पोलिसांना संबंधित गुन्हेगारांच्या म्होरक्याला पकडण्यात यश आले आहे. त्याने साथीदारासह परिसरातून सुमारे आठ लाख ३२ हजार किमतीच्या तब्बल १६ दुचाकी चोरल्याची कबुलीसुद्धा दिली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अशा स्थितीत दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याचे लक्षात घेता त्यांचा पोलीस प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती. या दरम्यान, भुसावळ रेल्वे स्थानकाजवळून अजहरुद्दीन शेख (रा. गोसीयानगर) यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचा तपास पोलिसांनी केल्यानंतर थेट दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासोबतच गोपनीय माहिती देणाऱ्यांचा प्रभावी वापर करून दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास पुढे नेला. या तपासादरम्यान काल्या उर्फ विक्रम केसरसिंग बारेला (२०, रा. गारग्या, मध्य प्रदेश) याची संशयित म्हणून ओळख पटली. तो बऱ्हाणपूर जिल्ह्यातील शाहपूर येथे असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्याला तेथूनच ताब्यात घेतले. या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या अचूक तपासकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित विक्रम बारेला याची कसून चौकशी केली असता, त्याने साथीदार राहुल चव्हाण (१८, रा. शाहपूर) याच्या मदतीने सदर दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या सांगण्यावरून भुसावळ तालुक्यातील चोरवड परिसरातून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली. या कारवाईतून शहरात मोटरसायकल चोरीचे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले.
१६ दुचाकी चोरल्याची कबुली
पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही संशयितांची वेळोवेळी पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. या दरम्यान संशयितांनी भुसावळ परिसरातून एकूण १६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सर्व दुचाकींची एकूण किंमत आठ लाख ३२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी संशयितांच्या मदतीने चोरी केलेल्या सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावित आणि निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही यशस्वी कारवाई केली.