नाशिक – शासकीय आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांनी एकिकडे आदिवासी विकास भवनासमोरील ठिय्या आठव्या दिवशीही कायम ठेवतानाच आंदोलनाची दिशा बदलली आहे. आता त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधातील राजकीय पक्षांपुढे आपले गाऱ्हाणे मांडण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत गुरुवारी काही आंदोलकांनी मुंबई येथे जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी आंदोलकांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
शासकीय आश्रमशाळा रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बाह्यस्त्रोताद्वारे भरतीला विरोध आहे. त्यासाठी त्यांनी आदिवासी विकास भवनाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिलेला आहे. ऊन, पावसाची पर्वा न करता आंदोलक एकाच जागी बसून आहेत. आजपर्यंत सत्ताधाऱ्यांशी संबंधित अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आ. नितीन पवार, हिरामण खोसकर यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली आहे. झिरवळ यांनी आंदोलकांशी तीन तास चर्चा केली होती. परंतु, कोणतेही लेखी आश्वासन देण्यात न आल्याने चर्चा निष्पळ ठरली. काही संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
आंदोलनास आठ दिवस झाल्याने आंदोलनकर्त्यांचा धीर आता खचत चालला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटायचे हा निर्धार असला तरी बदलते हवामान, प्रशासनाची उदासीनता, मदतीचा आटत चाललेला ओघ, किती दिवस अजून वाट पाहणार हा घरच्यांचा आर्त सवाल आंदोलकांना निरूत्तर करीत आहे.
दरम्यान, आता आंदोलकांनी आता राजकीय पक्षांचे दार ठोठावण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारी काही आंदोलकांनी सकाळीच मुंबईच्या दिशेने बसमधून प्रस्थान केले. शिष्ट मंडळाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. शिष्टमंडळाशी राज ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. दोन दिवसांत मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यावर आंदोलकांना शिवतीर्थांबाहेर येऊन न्याय देण्याची हमी दिली.
प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जनहित कक्ष व विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल बनभेरू उपस्थित होते. रोजंदारी कर्मचारी संघटनेकडून अंकुश चव्हाण, सुवर्णा वाघ आणि इतर उपस्थित होते. दुसरीकडे, नाशिक येथे काही आंदोलकांच्या घरून त्यांच्यासाठी शिदोरी आणण्यात आली. आंदोलकांनी कुटूंबियातील सदस्य तसेच सहकाऱ्यांसह जेवणाचा आनंद घेतला.