जळगाव : शहरालगतच्या एका रस्त्याच्या कडेला कोणीतरी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेली ध्वज, रूमाल आणि इतरही बरेच कापडी साहित्य फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावर लोकसत्ताने प्रकाशझोत टाकल्यानंतर जाग आलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने कचऱ्याचा तो ढिगारा उकरून काढला. प्रत्यक्षात, त्याखाली काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेचेही साहित्य आढळल्याने खळबळ उडाली आहे.
निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यावर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून प्रचार प्रारंभ केला जातो. तत्पूर्वी, प्रचारासाठी लागणाऱ्या विविध साहित्याला या काळात मागणी वाढते. राजकीय पक्षांची चिन्ह असलेली ध्वज, रूमाल, दुपट्टे, पेंडंट, टी शर्ट, चिन्हांकित पेन आणि टोप्या यांचीही जोरदार विक्री सुरू होते. त्या साहित्याच्या माध्यमातून जिकडे तिकडे आपली किती हवा आहे, ते दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करताना दिसतो. अर्थात, निवडणुका आटोपल्यानंतर राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वापरलेल्या साहित्याला काडीची किंमत दिली जात नाही. लागोपाठ निवडणुका आल्या तरी बदलत्या ट्रेंडनुसार नवीन साहित्याची मागणी राजकीय पक्षांकडून नोंदवली जाते. त्यामुळे निवडणूक साहित्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही बदल स्वीकारून सातत्याने नवीन साहित्य विक्रीसाठी ठेवावे लागते.
अशा परिस्थितीत, कालबाह्य झालेल्या जुन्या साहित्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची काळजी कोणतेच राजकीय पक्ष घेत नाहीत. विक्रेत्यांचे मग विचारणेच नको. नव्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर राजकीय पक्षांच्या जुन्या कालबाह्य साहित्याचा साठा काढून नवीन साहित्य मागविण्याची लगबग त्यांना करावी लागते. अशा वेळी जुन्या साहित्याचे करावे तरी काय, असा प्रश्न पडल्यावर जास्त डोक्याला ताण कोणीच घेत नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यासह असतील नसतील त्या राजकीय पक्षांचे साहित्य एका गाडीत भरले जाते. आणि शहरालगतच्या डंपिंग ग्राऊंडवर किंवा रस्त्याच्या कडेला कुठेही जागा दिसेल तिथे ते फेकण्यात येते.
हा जळगावमधील प्रकार लोकसत्ताने शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. प्रथमदर्शनी ढिगाऱ्यावर काँग्रेसची चिन्हे असलेली ध्वज, रूमाल आणि इतरही बरेच साहित्य दिसून आले होते. त्यासंदर्भात सचित्र वृत्त लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पक्षाचे जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना तातडीने खात्री करण्यासाठी घटनास्थळी पाठवले. प्रत्यक्षात, संबंधितांनी तो ढिगारा उकरून पाहिल्यावर त्याखाली काँग्रेससह भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षांचेही ध्वज, रूमाल वगैरे साहित्य दिसून आले. ज्याबद्दल आतापर्यंत कोणाला काहीच माहिती नव्हते. किमान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर त्याची उकल तरी झाली. एकूण सर्व प्रकाराकडे पाहून रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सुद्धा चिंता व्यक्त केली.
