नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत रविवारी नशामुक्त भारत या संकल्पनेवर आधारीत शहरात नमो युवा रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ झाला. स्पर्धेत पाच व तीन किलोमीटरचे टप्पे होते. खुद्द मंत्री महाजन हे देखील काही अंतर धावले. या तंदुरुस्तीचे रहस्य त्यांनी नंतर उघड केले.

भाजप युवा मोर्चाच्यावतीने आयोजित मॅरेथॉनच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने् वातावरण निर्मिती केली. या उपक्रमात हजारो युवक-युवतींनी सहभागी झाले. त्र्यंबक रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, धावपटू कविता राऊत, पूर्वा घिया, मोनिका आथरे आदी उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी नशामुक्त भारत हा संकल्प या मॅरेथॉनमुळे अधिक बळकट होणार असल्याचे नमूद केले. बलशाली भारत घडवण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असून युवकांनी व्यसनापासून दूर रहावे. सशक्त भारत, बलशाली भारत घडवण्यासाठी व्यायाम हा तितकाच महत्त्वाचा आहे. या स्पर्धेतून तरुणांमध्ये जनजागृती होऊन तरूण व्यसनापासून दूर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पर्धेत वेगवेगळ्या गटात गोविंद पांडे, हृषिकेश वावरे, ईश्वर झिरवाळ, अर्चना शिवराम, अंजली पंडित, शुभांगी गायकर, रोहित चौधरी, गणेश बावले, योगेश पाडवी, रविना गायकवाड, दिशा बोरसे, साक्षी कसबे हे विजेते ठरले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजयुमोचे प्रवीण भाटे, प्रदेश महामंत्री योगेश मेंद, मंडल अध्यक्ष अक्षय गांगुर्डे, संकेत खोडे आदींनी परिश्रम घेतले.

या वयात मॅरेथॉनमध्ये धावल्याबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन यांनी तंदुरुस्तीचे रहस्य उलगडले. माझे फार वय झालेले नाही. मी तरूणच असल्याचे त्यांनी मिस्किलपणे नमूद केले. ४० वर्षांपासून मी निवडून येत आहे. पाच वर्ष सरपंच होतो. ३५ वर्ष आमदार आहे. त्यावरून तुम्ही वयाचा अंदाज लावू शकतात. प्रत्येकाचा फिटनेस असला पाहिजे. मी रोज पाच ते सात किलोमीटर धावतो. व्यायामशाळेत जातो. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळतो. हॉटेलमधील खाद्यपदार्थ खात नाही. मला कुठलेही व्यसन नाही. तंबाकू, पानही खात नाही. दारू, बिअर, वा वाईन असे काहीच घेत नाही. तेलकट खाणे टाळतो. भोजन झाल्यानंतर लगेच झोपता कामा नये. हलका व्यायाम करायला हवा. आजपर्यंत चहा घेतलेला नाही. त्याची चवही आपणास माहिती नसल्याचे महाजन यांनी सांगितले.