नंदुरबार : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर आता राजकीय रंग भरण्यास सुरवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसह (एकनाथ शिंदे) काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांच्या अनुषंगाने तयारीसाठी डॉ. विजयकुमार गावित यांनी जिल्हाभर कार्यकर्त्याचे दौरे आणि सभांचा सपाटा लावला आहे. स्वबळावर लढण्याचे डाॅ. विजयकुमार गावित यांनी याआधीच जाहीर केले आहे. अक्कलकुवा येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गावित यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले. निवडणूकांआधी या दोन्ही पक्षातील नेते माझ्या नावाने आपल्या कार्यकर्त्यांना दम देतील, घाबरवतील. मात्र घाबरु नका. पुढील सहा महिन्यात हे दोन्ही पक्षाचे नेते तुमचे नाव घेणार नाहीत, अशी फिल्डिंग लावतो. चोर लोक माझ्याविरोधात एकत्र आले आहेत. मी मंत्री असताना रस्ते, आश्रमशाळा, वसतिगृह, ठक्कर बाप्पा योजनेची कामे आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद पंचायत समितीमधून मंजुर केली. आता या कामाचे नारळ फोडून श्रेय लाटण्याची घाई या विरोधकांना झाली आहे. ही कामे आपण मंजुर केली असल्याने आपणच नारळ फोडणार असल्याचे डॉ. गावित यावेळी म्हणाले.
डॉ. गावित यांनी आता शिंदे गटासह काँग्रेसलाही लक्ष्य केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागच्या काळात जिल्हा परिषदेमध्ये जवळपास समसमान जागा निवडून आणत काँग्रेस आणि भाजप हे नंबर एकचे पक्ष ठरले होते. सुरवातीच्या अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी झाल्याने काँग्रेसने शिवसेनेला बरोबर घेत अडीच वर्षांची सत्ता भोगली. मात्र नंतरच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात डॉ. विजयकुमार गावितांनी शिवसेनेला बाजुला ठेवून थेट काँग्रेसच्या फुटीर सदस्यांच्या जोरावर जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर घडवून आणत स्वत:ची दुसरी मुलगी डॉ. सुप्रिया गावित यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले होते. यानंतर मात्र मोठी मुलगी डॉ. हिना गावित यांचा लोकसभा निवडणूकीत झालेला पराभव, त्यांनतर जानेवारीमध्ये जिल्हा परिषदेचा संपलेला कार्यकाळ, भाजपने मंत्रीपदापासून दूर ठेवणे, या घडामोडी घडल्या.
त्यामुळे डाॅ. विजयकुमार गावित यांची नंदुरबार जिल्ह्यावरील पकड सैल झाल्याची चर्चा सुरु झाली. डाॅ. गावित यांनाही कदाचित, याची जाणीव झाली असावी, त्यामुळे जिल्ह्यावर पक्कड मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषदेवर सत्ता मिळणे आवश्यक झाले आहेत. त्यासाठी त्यांनी आता आपला मोर्चा शिंदे गट आणि काँग्रेसविरोधात वळवला असून जिल्हाभर दौरा करत आहेत.