छगन भुजबळ यांचे भाजप नेत्याकडून अभिनंदन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात जिल्ह्य़ातील बोट क्लब, कलाग्राम, मनोरंजन पार्क, ग्रेप पार्क रिसॉर्ट यांसारखे अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण केले. मात्र गेल्या पाच वर्षांत ते का सुरू होऊ  शकले नाही, हा प्रश्नच आहे. आता हे सर्व रखडलेले प्रकल्प प्राधान्यक्रमाने मार्गी लावले जातील. तसेच जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रात नवी गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ हे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी सकाळी येथील कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. अभिनंदन करण्यात शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांप्रमाणेच जुन्या मित्रपश्रातील प्रदेश पदाधिकारी होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांच्या भेटीकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

महिनाभरापासून सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू राहिल्याने महिन्यापेक्षा जास्त काळ नाशिक आणि येवल्याला येऊ  शकलो नसल्याचे कारण भुजबळ यांनी दिले. समाजात विकृत गुन्ह्य़ांची वाढ झाली असून अत्याचाराच्या घटना या वेदनादायी आहेत. नागरिकांनी आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. या घटना रोखण्यासाठी कायद्याची कडक अमलबजावणी केली जाईल. तसेच यावर जो त्वरीत कारवाई करत नाही, त्या पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. येत्या काही दिवसांत हा प्रश्न मिटेल. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे. त्यांना माझा विरोध नाही. उलट त्यांना परत आणण्यासाठी आपण प्रयत्न केले. त्यांना पद देण्याचा अधिकार हा पवार साहेबांचा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

‘आपला राजकीय पुनर्जन्म’

१९९१ साली पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर २५ वर्षांत मिंत्रपदावर काम केले. पाच वर्षांचा कालावधी भुजबळ कुटुंबियांसाठी अत्यंत खडतर होता. अशा वेळी भुजबळ संपले, अशा वार्ता पसरविल्या जात होत्या. मात्र मतदारसंघातील जनता आणि पवार साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजकीय पुनर्जन्म झाला. मंत्रिपदावर काम करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळाली याचा आनंद होत असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

अभिनंदनात गैर काय – वसंत गिते

भुजबळ यांचे स्वागत करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांची भेट सर्वाचे लक्ष वेधणारी ठरली. विधानसभा निवडणुकीत गितेंना भाजपने तिकीट दिले नव्हते. यामुळे ते देखील नाराज असल्याचे सांगितले जाते. परंतु, ही केवळ अभिनंदनपर भेट असल्याचे खुद्द गिते यांनी सांगितले. भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. आगामी काळात शहर, जिल्ह्य़ाच्या विकासासाठी त्यांची मदत महत्वाची ठरणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते सेना पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतात. यामुळे स्थानिक नेत्यांनी त्याचे अनुकरण करण्यात काही गैर नसल्याचे गिते यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर आदींनी भुजबळांची भेट घेऊन अभिनंदन केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders meet chhagan bhujbal in nashik zws
First published on: 10-12-2019 at 03:55 IST