नाशिक – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येवला मतदारसंघात आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी भुजबळ यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी झाली. काळे झेंडे दाखवून ‘चले जाव’च्या घोषणा दिल्या गेल्या. मनमाड चौफुलीवर मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. या विरोधामुळे भुजबळ यांना काही गावांत पाहणीसाठी जाता आले नाही.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ३५ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. येवला तालुक्यालाही नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी भुजबळ हे आपल्या येवला मतदारसंघात आले होते. मागील काही दिवसांपासून सकल मराठा समाजाचे मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यात वाकयुद्ध होत आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्यास भुजबळांनी विरोध केल्यामुळे मराठा समाजात रोष पसरला आहे. त्याचे पडसाद या पाहणी दौऱ्यात आंदोलनातून उमटले. ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी विरोध केला. परिणामी पाहणी करताना भुजबळांच्या ताफ्याला मार्गही बदलावा लागला. सोमठाणे आणि कोटमगाव येथे मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर मराठा आंदोलक रस्त्याकडे पाठ करून बसले होते. काळे झेंडे दाखवत त्यांनी भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. भुजबळांचा ताफा निघून गेल्यानंतर रस्त्यावर गोमूत्र शिंपडले गेले.

हेही वाचा – हवाई प्रशिक्षणात आभासी प्रणालीवर भर, आर्मी एव्हिएशन स्कूलचा दीक्षांत सोहळा

हेही वाचा – समायोजनासाठी धुळ्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विंचूर चौफुलीवर मराठा आंदोलकांनी ठिय्या दिला होता. सोमठाणे गावात नुकसानीची पाहणी भुजबळ करणार होते. परंतु, विरोधामुळे त्यांना या गावात जाता आले नाही. विंचूर चौफुलीवर मराठा आंदोलक एकत्र आले असताना भुजबळ यांनी मुखेड दौरा केल्याची चर्चा आहे. दौऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली होती. या सर्व घटनाक्रमावर राजकारण्यांना काळे झेंडे दाखविणे काही विशेष नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेणे अधिक महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.