धुळे – जिल्ह्याच्या माळमाथ्यावर पावसाचे प्रमाण वाढल्याने पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. एकट्या पांझरा (अक्कलपाडा ) मध्यम प्रकल्पातून तीन हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत असल्याने नदीतील पाण्याची पातळी वाढली असून पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धुळे शहरातील देवपूर भागास जोडणाऱ्या कालिका देवी मंदिराजवळील पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु असल्याने त्या त्या भागातील तलाव आणि इतर प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. शासनाचा मध्यम प्रकल्प विभाग आणि अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग यांच्यातर्फे धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये वाढणारा पाणी साठा आणि साठवण क्षमतेच्या अनुषंगाने आवश्यकती खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच  भाग म्हणून मध्यम प्रकल्प विभाग आणि अक्कलपाडा प्रकल्प उपविभागीय अधिकाऱ्यांनी पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या वाढत्या पावसाचा विचार करून अक्कलपाडा प्रकल्पावरील बाजूस असलेल्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा येवा वाढत असल्याने निम्न पांझरा (अक्कलपाडा ) मध्यम प्रकल्पातून तीन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. विसर्गात वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने पांझरा नदीच्या दोन्ही काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा विभाग यांच्यामार्फत पांझरा नदी किनाऱ्यालगत रहिवासास असलेल्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून धुळे शहर आणि देवपूर या भागांना जोडणारा पांझरा नदीवरील कालिका माता मंदिरजवळील रहदारी पूल बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुळे जिल्ह्यांतील जलसाठा

पांझरा – सद्यस्थिती-१००टक्के ( मागील वर्षी २५), मालनगाव- १०० (५८), जामखेडी- १०० (३४), कनोली-१४ (३०), बुराई- ३५ (२०), करवंद – ३५ (२०), अनेर- २९ (३४), सोनवद- नऊ (नऊ), अक्कलपाडा- ८२ (सात), वाडीशेवाडी- ४४ (१३), अमरावती-५५ (शून्य), सुलवाडे-३० (२२) याप्रमाणे जलसाठ्याची स्थिती आहे. शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात जुलै महिना संपत आला तरी दमदार पाऊस न झाल्याने पेरणी केलेल्या रोपांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कनोली,बुराई, करवंद, सोनवद, अमरावती, सुलवाई या प्रकल्पांमध्ये अद्याप पुरेसा साठा झालेला नाही.