लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : देवळा तालुक्यातील वाजगाव येथे रविवारी सकाळी १० वाजता शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ३० ट्रॉली भरेल इतका गुरांचा चारा खाक झाल्याने सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. ऐन टंचाईत शेतकऱ्याला हा मोठा फटका बसला आहे.घटनास्थळी आ. डॉ. राहुल आहेर यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीर दिला व भरपाई मिळून देण्याचे आश्वासन दिले.
वाजगाव येथील शेतकरी अमोल देवरे यांनी शेतात गुरांसाठी सुमारे ३० ट्रॉली भरेल इतका मक्याचा चारा रचून ठेवला होता. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे चाऱ्याला आग लागली. परिसरातील लोकांनी चारा मालक देवरे यांना माहिती दिली. परिसरातील लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनानेही आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. आगीमुळे जवळच राहणाऱ्या आदिवासी वस्तीतील लोकांमध्ये घबराट पसरली होती. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने त्यांना दिलासा मिळाला.
आणखी वाचा-नाशिक : जिल्ह्यात दोन घरफोडींमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
वडाळा येथील अरुण पवार यांनी घटनास्थळी तत्काळ पाण्याचा टँकर पाठवून आग विझविण्यासाठी मदत केली. आगीमुळे देवरे यांचे जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, तलाठी हे घटनास्थळी कोतवालला पाठवून माहिती घेत सोमवारी पंचनामा करणार असल्याची माहिती देवरे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट देत नुकसानीची पाहणी केली.