लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा तपासण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने तिसरी ते आठवीच्या वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. तिसरी ते आठवीसाठी चार ते सहा एप्रिल या कालावधीत या परीक्षा शाळेत घेतल्या जाणार आहेत.

नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा तपासण्यासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे नियोजित वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांच्या नियोजनामुळे बदलले आहे. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन ( दोन) द्वारे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व उत्तर सूची पुरवण्यात येणार आहे. याआधी परीक्षा दोन ते चार एप्रिल या कालावधीत होणार होती. तांत्रिक कारणास्तव आता या परीक्षा चार ते सहा एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-जळगाव, रावेर जागेसाठी मविआचा काथ्याकूट सुरुच, ठाकरे गटाकडून संपदा पाटील यांचे नाव चर्चेत

याअंतर्गत चार एप्रिल रोजी प्रथम भाषा सर्व माध्यम – तिसरी चौथी, गणित सर्व माध्यम, पाच एप्रिल रोजी पाचवी-सहावी, इंग्रजी, सहा एप्रिल रोजी सातवी-आठवीसाठी परीक्षा होणार आहे. सध्या शाळास्तरावर वार्षिक परीक्षा सुरू असल्या तरी तीन विषयाची संकलित परीक्षा आणि वार्षिक परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात यावी, अशी सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.