नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नवीन वळण रस्ता करण्याचे ठरविल्यास भूसंपादनासह अन्य प्रक्रियेत दोन वर्ष निघून जातील. वेळ व पैसा वाया जाईल. यापूर्वी शहरात अंतर्गत व बहिर्गत वळण रस्ते तयार केले आहेत. त्यांचे रुंदीकरण व दुरुस्ती करून वापर करता येईल. मनपासह विविध विभागांनी १५ ते २० हजार कोटींचे आराखडे सरकारकडे सादर केले आहेत. परंतु, तेवढा निधी मिळणार नाही. त्यामुळे अतिआवश्यक कामांवर लक्ष देण्याची गरज नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.

मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर गुरुवारी भुजबळ यांचे शहरात प्रथमच आगमन झाले. शहर आणि ग्रामीण भागात त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. यानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कुंभमेळ्या्आधी गोदावरी प्रदूषणमुक्त झाल्यास मोठे काम होईल, भाविकांना शुद्ध तीर्थ घरी नेता येईल याकडे लक्ष वेधले. स्थानिक वास्तूविशारद आणि नागरिकांनी कुंभमेळ्यात कोणत्या कामांची गरज आहे, याबद्दल सूचना करण्याचे आवाहन त्यांनी केले. नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प सुरु होणे आवश्यक आहे. धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य, शेतीवर आधारीत पर्यटनासाठी जिल्ह्यात प्रगतीच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

धूर सोडणारे कारखाने शहराबाहेर हवेत. जिंदाल पॉलीफिल्म्सच्या आगीचा संदर्भ देत हा कारखाना शहरात असता तर संपूर्ण नाशिकवर काजळी पसरली असती, नागरिकांना घशाला त्रास झाला असता, असे त्यांनी सांगितले. मोठ्या क्षेत्रात पसरलेल्या या कारखान्यातील सर्व विभाग आगीच्या वेढ्यात सापडले आहेत. या परिसरात रसायनाच्या टाक्या असल्याने आग पसरू नये म्हणून आसपासच्या भागातील नागरिकांना घरे बंद करून दूर जाण्याचे आवाहन करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांवर आपण प्रदीर्घ काळापासून काम करीत असल्याचे मांडत त्यांनी बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सापशिडीचा खेळ

मंत्रीपद मिळू नये म्हणून प्रयत्न झाल्याच्या प्रश्नावर भुजबळ यांनी पक्षात प्रत्येक जण मंत्रीपद मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. यात राग मानण्याचे कारण नसल्याचे नमूद केले. राजकारणात आल्यापासून आपल्या आयुष्यात सापशिडीचा खेळ सुरू आहे. ज्यांनी तो खेळला ते एकदम वर गेले, तसेच खाली आले, असा टोला त्यांनी हाणला.