नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील नियोजनाविषयी अनभिज्ञ असणारे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी कुंभमेळ्याची पहिली आढावा बैठक घेतली. जी कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्णत्वास जाणे अशक्य आहे, अशी नवीन कामे हाती घेऊ नये, अशी सूचना त्यांनी केली. ही बैठक आपण पालकमंत्री म्हणून नव्हे तर, मंत्री या नात्याने घेतली. स्थानिक मंत्री म्हणून तो आपला अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीत पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. कुंभमेळ्याची जबाबदारी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. नाशिकचे पालकमंत्रीपदही महाजन यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या विरोधामुळे स्थगित करावा लागला होता. कुंभमेळ्याच्या नियोजनात काही अपवाद वगळता मित्रपक्षातील मंत्री दूर राहिले होते. या पार्श्वभूमीवर, भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक घेत भाजपसह शिंदे गटाला शह दिल्याचे मानले जाते.

यासंदर्भात वेगळे अर्थ काढण्याची किेवा वाद निर्माण करण्याची गरज नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले. सिंहस्थ कामांवर शासकीय निधी खर्च होत आहे. एक मंत्री म्हणून ते आपण जाणून घेऊ शकतो. कुंभमेळा प्राधिकरणाचे कागदोपत्री बरेचसे काम झाले आहे. काही कामे मंजूर असून काहींना मंजुरी मिळणे बाकी आहे. पावसाळा संपताच ही सर्व कामे सुरू व्हायला हवीत. ही कामे रेंगाळली तर अडचणी येऊ शकतात. कुंभमेळापर्यंत म्हणजे पुढील दीड ते पावणेदोन वर्षात पूर्ण न होऊ शकणारी कुठलीही नवीन कामे यात समाविष्ट करू नयेत. द्वारका चौकातील भुयारी मार्गांसह महामार्गावरील अन्य कामेही सिंहस्थानंतर करावी. कारण रस्त्यांचे खोदकाम करून उपयोग होणार नसल्याचे त्यांनी सूचित केले. साधूग्रामची जागा कायमस्वरुपी संपादित करण्याचा विषय प्रलंबित आहे. यातील काही जागा भाडेतत्वावर घेण्याचा विचार आहे. यातील योग्य तो पर्याय निवडून हा विषयही लवकर मार्गी लावावा असे भुजबळ यांनी नमूद केले.

कुंभमेळ्यानिमित्त नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे होणार आहेत. ही सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. समृध्दी महामार्गाला इगतपुरीहून असलेल्या आंतरबदल रस्त्याचे काम पूर्ण करण्याची आवश्यकता भुजबळ यांनी मांडली यावेळी विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.