जळगाव – जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने चोपडा विभागातील प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिवांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्या ठिकाणी दूध संघाची वाटचाल, शीतकरण केंद्रांची प्रगती, दूध पुरवठादार संस्थांच्या अडचणी आणि आगामी काळातील आव्हाने, या विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक रोहित निकम होते. या वेळी कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे, तावसे संस्थेचे अध्यक्ष विवेक पाटील, रामेश्वर-सनपुले संस्थेचे प्रल्हाद पाटील, रुंधाटीचे नितीन पवार, चहार्डीचे सतीश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच भारत माता, गो माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. २०२४-२५ मध्ये चोपडा तालुक्यातून सर्वाधिक म्हैस आणि गायीच्या दुधाचा पुरवठा करणारी तसेच दूध शीतकरण केंद्र/विभागातून सर्वाधिक पशुखाद्य खरेदी करणारी प्रथम क्रमांकाची संस्था आणि त्यांचे अध्यक्ष यांचा गौरव करण्यात आला.
गायींसह म्हशींचा दुधाचा पुरवठा वाढविण्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर उपलब्ध होणारे पशुखाद्य अत्यंत महत्त्वाचे असते. त्याची काळजी घेतल्यास दूध उत्पादन वाढ शक्य होते. दूध उत्पादक संस्थांनी विकास दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर भर दिल्यास त्यांना आर्थिक लाभ मिळेल. जिल्हा दूध संघाच्या ५५ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत मोठी साखळी तयार झाली असून, त्याचा योग्य विनिमय करून संस्थांनी एकमेकांना सहकार्य करावे.
राज्य शासनाकडे पशुखाद्यासाठी तालुका पातळीवर गोदामे, दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, अनुदान उपलब्धतेसाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही देखील रोहित निकम यांनी दिली. तसेच नियमित दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांसाठी विशेष योजना, डिपॉझिट शेअर कॅपिटल रूपांतर, पशुखाद्य अनुदानासारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबतही त्यांनी आश्वस्त केले.
कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या विविध अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यावर सखोल चर्चा केली. कार्यशाळेत जिल्हा दूध संघाची वाटचाल, दूध शीतकरण केंद्रांची प्रगती, संस्थांच्या अडीअडचणी आणि आगामी आव्हाने या विषयावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला. प्रास्ताविक दूध संघाचे व्यवस्थापक जयेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले. ईश्वंकू पाटील, निकितेश निर्मळ, डॉ. विमलेश रॉय , गजानन ढाले, राजेंद्र वाघ, केशव पाटील, चोपडा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.