नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यांतील १० हजार ३२५ जलस्त्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहीम ३० एप्रिलपर्यंत पूर्णत्वास नेली जाणार आहे. या मोहिमेत जलस्त्रोतांच्या गुणवत्तेनुसार लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे.

स्वच्छता सर्वेक्षण अभियानात १०३२५ स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. आरोग्य विभाग आणि जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष यांच्या समन्वयाने हे अभियान राबविले जात आहे. सर्वेक्षणाद्वारे ग्रामपंचायतींना लाल, हिरवे, पिवळे, चंदेरी कार्ड वितरीत केले जाते. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत द्वितीय वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. पाणी गुणवत्ता शाखेकडून शुद्ध निर्जंतुक पाणी ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्वेक्षण राबविले जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यात नळ पाणी पुरवठा योजनेचे ४६१३ तर हातपंप, सार्वजनिक विहिरी ५७१२ असे एकूण १०,३२५ जलस्त्रोत आहेत. त्यांची तपासणी याद्वारे होईल. पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात १०० टक्के पूर्ण करावे, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी दिली आहे.

हेही वाचा…काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक

पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी नियोजन केले आहे. या अंतर्गत जलसुरक्षक ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक यांच्या सहकार्याने गोळा करतील. संकलित केलेल्या पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या प्रयोग शाळांतून करण्यात येणार आहे.

हेही वाचा…खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाणी गुणवत्तेविषयी कार्डद्वारे जोखीम निश्चिती

या अभियानात जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याद्वारे स्त्रोतांचा परिसर, योजनेतील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीला पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चित करण्यात येणार आहे. या आधारे ग्रामपंचायतीस लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेने म्हटले आहे.