नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनास शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे यांंच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महानुभावपंथीय प्रवीण तायडे, अमोल जावळे आणि श्वेताताई नाईक या तीन आमदारांचा सत्कार करण्यात आला. परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष महंत मोहनराज कारंजेकर यांनी या तीन आमदारांची माहिती दिली. हा धागा पकडून नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर भाष्य केले.

अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या दोन दिवसीय अधिवेशनास पंचवटीतील जय शंकर फेस्टीव्हल लॉन्स येथे सुरूवात झाली. अधिवेशनात महाराष्ट्रासह दिल्ली, कोलकाता, अमृतसर अशा विविध भागातून महानुभावपंथीय सहभागी झाले आहेत. या सोहळ्यात अखील भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा शास्त्री (फलटण) यांच्याकडून नियोजित अध्यक्ष महंत मोहनराज कारंजेकर बाबा (अमरावती ) यांनी पदभार स्वीकारला. प्रारंभी नवनिर्वाचित अध्यक्ष महंत कारंजेकर यांनी मनोगतात अधिवेशनासाठी विविध भागातून आलेल्या आणि अधिवेशन यशस्वी करण्यात योगदान देणाऱ्यांची यादी मांडली.

महानुभाव पंथांचे विविध प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गी लावल्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले. परिषदेच्या स्थापनेला ११४ वर्ष झाली. आजवर मुख्यमंत्र्यांनी जी दखल घेतली नव्हती. ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव अधिवेशनात मांडला जाणार असल्याचे सांगितले. महानुभाव तत्वांचे पालन करणारे महाराष्ट्रात तीन आमदार निवडून आले. अचलपूरचे प्रवीण तायडे, जळगावचे अमोल जावळे आणि श्वेताताई महाले या आमदारांची प्राथमिक ओळख त्यांनी सत्कारावेळी करून दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणात महंत कारंजेकर यांच्या संदर्भाचा धागा पकडला. यानिमित्ताने महंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी येता आले. महंत कारंजेकर हे जे म्हणतील, त्या सर्व गोष्टी मान्य आहेत. परंतु, एक गोष्ट आपणास मान्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. महानुभाव पंथाचे महाराष्ट्रात तीन आमदार असल्याच्या त्यांच्या विधानात आपण थोडी दुरुस्ती करतो. महाराष्ट्रात महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री देखील निवडून आला आहे हे सांगायला ते विसरले. मला पंथांच्या बाहेर का ठेवताय, असे मिश्किलपणे नमूद करीत फडणवीस यांनी महानुभाव पंथांची परंपरा आपणास माहिती आहे. मीही पंथाच्या बाहेर नाही. यापुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महानुभाव पंथाचा आहे, असे सांगितले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.