नाशिक – शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अलीकडे सुरु झालेली पोलीस कारवाई याची छाप भाजपच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीवर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना बोलणे भाग पडले. गुन्हेगारांचा राजाश्रय मोडून काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याची सुरुवात भाजपमधून होईल का, असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे वादग्रस्त मंडळींना पक्षात परस्पर प्रवेश देणाऱ्या कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीला चाप लागणार असल्याची भावना पक्षातून उमटत आहे.
वाढत्या गुन्हेगारीविरोधात मागील महिन्यात मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी संयुक्त मोर्चा काढला होता. वाढत्या गुन्हेगारीला विरोधकांनी भाजपला जबाबदार धरले होते. खून व गोळीबारासारख्या घटनांमध्ये भाजपच्या दोन माजी नगरसेवकांच्या सहभागाकडे लक्ष वेधले गेले. गुन्हेगारीचा उंचावता आलेख महापालिका निवडणुकीत अडचणीचा ठरू शकतो. नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. यासंदर्भात भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परिस्थिती मांडल्यानंतर चक्रे फिरली.
पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. त्या अंतर्गत गोळीबार प्रकरणात भाजपचे नेते सुनील बागूल यांचा पुतण्या गौरव बागूल याच्यासह अलीकडेच भाजपवासी झालेल्या बाबासाहेब उर्फ मामा राजवाडे यांच्यावर अटकेची कारवाई झाली. मागील काही महिन्यात भाजपमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, सुनील बागूल, मामा राजवाडे यांना वाजतगाजत प्रवेश दिला गेला. याआधीही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना भाजपने आपलेसे केले आहे. नाशिक भाजपवर मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व आहे.
संबंधितांना प्रवेश देताना त्यांनी स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनाही विचारात घेतले नव्हते, स्थानिक विरोध डावलत हे प्रवेश झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. भाजप उत्तर महाराष्ट्रच्या बैठकीनिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमधील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्तांना पूर्णत: मोकळीक देण्यात आल्याचे सांगितले. गुन्हेगार भाजप, महायुती, ठाकरे गट, राष्ट्रवादी किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा असो, त्याला सोडू नका, कठोर कारवाई करा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
गुन्हेगारी मंडळींना काही लोक वेगवेगळ्या पक्षात राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात. तोही मोडून काढण्याचे निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये धीर आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींना भाजपमध्ये सामावण्यात मंत्री गिरीश महाजन यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा आरोप विरोधकांसह भाजपच्या वर्तुळातून होत आहे. वाढती गुन्हेगारी, यात अलीकडेच भाजपवासी झालेल्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आणि मुख्यमंत्र्यांची घोषणा यामुळे मंत्री महाजन यांच्या कुणालाही पक्षात घेण्याच्या धोरणाला लगाम घातला गेल्याचा अर्थ काढला जात आहे.