धुळे : शहरात भाजपचे माजी खासदार तथा तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी पुढाकार घेऊन उभारलेले खानदेश कॅन्सर सेंटर चर्चेत असतांना काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी आणखी एका कॅन्सर सेंटर उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याचा दावा केला आहे. नव्याने आकारास येणारे रुग्णालय आसामच्या धर्तीवर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी आसाम धर्तीच्या कॅन्सर सेंटरसाठी पुढाकार घेतला. उत्तर महाराष्ट्रात कर्करोगाने ग्रासलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याचे खासदार शोभाताई बच्छाव यांनी म्हटले असून पीडित रुग्णांना उपचारासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे किंवा मुंबई शहरात जावे लागते. अनेकांना गंभीर अवस्थेतच या मोठ्या शहरांपर्यंत प्रवास करावा लागतो. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शोभाताई बच्छाव यांनी थेट संसदेत आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
धुळे येथे अत्याधुनिक कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांच्या अडचणी मांडत शोभाताई बच्छाव यांनी संसदेतही याविषयाकडे लक्ष वेधले आहे. धुळे हे खान्देशचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे कॅन्सर उपचार केंद्र उभारल्यास धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील रुग्णांना दिलासा मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
सध्या कर्करोग निदान आणि उपचारासाठी होणारा उशीर आणि वाढता खर्च यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक आणि मानसिक ताण पडतो. या पार्श्वभूमीवर धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आसामच्या धर्तीवर कॅन्सर केअर सेंटर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी भेट घेतली. खासदार बच्छाव यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत धुळे शहरात लवकरच कॅन्सर हॉस्पिटल मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आल्यावर उत्तर महाराष्ट्रातील हजारो कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळेल आणि पर्यायाने धुळे जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नवे पर्व सुरू होउ शकेल, असे म्हटले जाते.
दरम्यान, नागपूर – सुरत महामार्गावर आणि भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरच अवघ्या काही अंतरावर माजी खासदार तथा तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी पुढाकार घेऊन खानदेश कॅन्सर सेंटर उभारले आहे. या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील बहुतेक भागातून कर्करोगग्रस्त उपचारासाठी येतात, पण आर्थिक भार सोसवला जात नसल्याने अनेकांना शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरत नाही. यामुळे उत्तर महाराष्ट्रतून रोज शेकडो रुग्ण मुंबईकडे जाणे पसंत करतात अशी परिस्थिती आहे.
