नाशिक :लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नाशिकमध्ये आल्यास यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांच्या वाहनावर दगडफेक करू, अशी विधाने करणारे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांच्याविरुद्ध काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संशयितावर कठोर कारवाईची मागणी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी दराडे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले होते. सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्या प्रकरणी नाशिक न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल आहे. यासाठी त्यांना नाशिकला हजर रहावे लागू शकते. राहुल गांधी हे नाशिकमध्ये आल्यास विरोध केला जाईल, शक्य झाल्यास तोंडाला काळे फासू अथवा त्यांच्या वाहनावर दगडफेक करु, अशी विधाने दराडे यांनी चित्रफितीत केली होती. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन दिले. दराडे यांनी अशी विधाने करून संविधानिक पदावरील व्यक्तीला एकप्रकारे जिवे मारण्याची धमकी दिली. ही बाब निंदनीय असून संबंधितावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अंबड पोलीस ठाण्यात निरीक्षक राकेश हांडे यांची भेट घेऊन दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून ठिय्या मांडला. त्यानंतर ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख दराडे यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, काँग्रेसचे कार्यकर्ते संयमी असले तरी आरे ला कारे करण्याची ताकतही पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. पण काँग्रेसची ती संस्कृती नाही. लोकशाही मार्गाने कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही केली. परंतु, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिला.