नाशिक : गोरगरीब कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहोत. या लढ्यात आपण एसटी कर्मचारी संघटनेबरोबर असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. आपल्या मागण्यांचे निवेदन हे आपले वकील म्हणून स्वीकारले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येथे रविवारी सेवा शक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यात भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार आदी उपस्थित होते.
पडळकर आणि खोत हे नेते जिथे अन्याय होतो, त्याठिकाणी नेहमीच पुढे राहून काम करतात. सर्वसामान्य कामगारांचे प्रश्न आपले प्रश्न म्हणून हे लढत आहेत. एसटी कर्मचारी कामाच्या अत्यंत अवघड परिस्थितीतही, खडतर हवामानात, अपुऱ्या सोयींमध्ये ही सेवा अखंड सुरू ठेवण्याचे काम करत आहेत. या सर्वांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. जगातील कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यात नाही. एसटी म्हणजे एक लोकसेवा आहे. गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ती महत्वाची वाहिनी आहे. त्यामुळे ही सेवा संस्था फायद्यात कधी येईल, याची वाट पाहत बसता येणार नाही.
जनतेच्या सेवेकरिता आवश्यक त्या तरतुदी एसटीला कराव्याच लागणार आहेत. कर्मचाऱ्यांना चांगल्या बसेस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळालेच पाहिजे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न वातानुकूलित व्यवस्थेत बसणाऱ्यांना नाही कळणार. असा टोला त्यांनी हाणला. यासाठी आपण विधिमंडळात आणि मंत्रिमंडळात देखील याबाबत हे प्रश्न मांडून ते मार्गी लावले जातील यासाठी तुमचे वकिलपत्र घेतले आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. मागील ६० वर्षांपासून मी राजकारण आणि समाजकारणात आहे. संघर्ष पाचवीला पुजलेला असतो. तिथे माघार घेता येत नाही, असे भुजबळ यांनी नमूद केले.लोक असेही बोलतात आणि तसेही. ज्या ज्या ठिकाणी लढण्याची गरज आहे, प्रश्न आहे, तिथे लढले पाहिजे, असे भुजबळ यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.