नाशिक – आदिवासी कंत्राटी कर्मचारी वर्ग तीन व चार संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकास भवनाच्या प्रवेशद्वारावर सुरु करण्यात आलेल्या आंदोलनास १२ पेक्षा अधिक दिवस झाले असून एका आंदोलकाची तब्येत बिघडल्याने त्यास तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलकांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून राज्य शासनाला चुकीची माहिती देत दिशाभुल करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
अन्नत्याग केलेले प्रा. तुळशीराम खोटरे यांची प्रकृती शुक्रवारी खालावली. राष्ट्रवादीचे सुरगाणा तालुकाध्यक्ष रणजीत गावित यांनी तसेच चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. उपोषणकर्ते खोटरे यांची परिस्थिती बघता आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर खोटरे यांचे १२ दिवस चाललेले उपोषण जाधव यांच्या हस्ते सोडविण्यात आले. खोटरे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, आंदोलकांच्या मागण्यांबाबत सातत्याने बैठका सुरू असतांना संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांविषयी चुकीची माहिती प्रशासनाकडून राज्य शासनाला दिली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्ते ललित चौधरी यांनी केला. आमच्या एक ते नऊ वर्षे सेवाकाळाचा विचार करून कायम सेवेच्या प्रक्रियेत समाविष्ट करावे, ही मागणी नसतांना वरिष्ठ पातळीवर आंदोलकांविषयी संभ्रम निर्माण केला जात असल्याचे चौधरी यांनी नमूद केले.
शाळेला कुलूप
महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील सराड येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक तसेच अन्य कर्मचारी नसल्याने शाळेला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले. प्रसंगी सरपंच, पोलीस पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोये, शिवसेना तालुकाप्रमुख हरिभाऊ भोये आदी उपस्थित होते. काँग्रेस तालुकाध्यक्ष सखाराम भोये आदिवासी बचावचे आनंदराव भोये, काशिनाथ भोये व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.