नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी प्रमाणपत्रे वैशिष्ठ्यपूर्ण असून त्यावरील सांकेतांक (क्यू्आर कोड) स्कॅन केल्यावर त्यांची वैधता पडताळता येणार आहे. अशा प्रकारे ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारीत प्रमाणपत्र वितरित करणारे मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरणार आहे.

मुक्त विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत सोहळा बुधवारी सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठ आवारात होत आहे. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित असतील. प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटी दिल्लीचे माजी संचालक डॉ. रघुनाथ शेवगावकर दीक्षांत भाषण करणार आहेत.

हेही वाचा – बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वनमंत्र्यांना साकडे

विद्यार्थ्यांना दिली जाणारी प्रमाणपत्रे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत आहेत. त्यावरील सांकेतांक स्कॅन करून त्याची वैधता पडताळता येईल. दीक्षांत सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राची डिजिटल प्रत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मुलाखत वा शैक्षणिक कामासाठी त्यांना मूळ प्रत बाळगण्याची आवश्यकता नाही. हे प्रमाणपत्र पाणी अथवा अन्य द्रव पदार्थाने खराब होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. कोणत्याही ऋतूमानाचा परिणाम होणार नाही, सहजासहजी ते फाटणार नाही, अशा दर्जाचा कागद त्यासाठी वापरण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक अशा अद्ययावत सुरक्षा मानकांचा त्यात समावेश करण्यात आल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

यंदा एकूण एक लाख ५५ हजार ६०७ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. यात १७८७३ पदविकाधारक, ११९ पदव्युत्तर पदविकाधारक, १०९१०१ पदवीधारक, २८६२६ पदव्युत्तर पदवीधारक, सात पीएचडीधारक आणि एमफीलधारकांचा समावेश आहे. यात ९७६४८ पुरुष तर ५७९५९ स्त्रीया आहेत. पदवीधारकांमध्ये १६४ दृष्टीबाधित तर ६० वर्षावरील १५५ विद्यार्थी आहेत. याशिवाय, विविध शिक्षणक्रम पूर्ण करून पदवी मिळवणाऱ्यांमध्ये ७१ शिक्षा भोगणाऱ्या बंदीजनांचा समावेश आहे. विशेष प्राविण्य मिळविलेल्या ११ स्नातकांना सुवर्णपदकाने गौरविले जाणार आहे.

मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी बुधवारी मोफत बससेवा

यशंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत सोहळा बुधवारी सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठ आवारात होत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्यभरातून येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विद्यापीठाने खास मोफत वाहतूक व्यवस्था केली आहे.

दीक्षांत सोहळ्यास उपस्थित राहणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विद्यापीठाकडून नाशिकरोड तसेच मध्यवर्ती बस स्थानक (सीबीएस) येथून बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. शहरापासून साधारणत: १५ किलोमीटर अंतरावर विद्यापीठाचे मुख्यालय आहे. नियमित बससेवा नसल्याने विद्यापीठात ये-जा करणे बाहेरून आलेल्यांना कठीण होते. रिक्षा वा खासगी वाहनाने जादा पैसे मोजावे लागतात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने दीक्षांत सोहळ्याच्या दिवशी बससेवा उपलब्ध केली आहे.

हेही वाचा – सातपुड्यात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची वीस किलोमीटर पायपीट कशासाठी ?

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बसचे नियोजन

नाशिकरोड आणि सीबीएस या ठिकाणाहून बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. नाशिकरोड ते मुक्त विद्यापीठ (सीबीएस, अशोक स्तंभ मार्गे) बुधवारी सकाळी आठ ते नऊ या कालावधीत बस उपलब्ध असतील. तर मुक्त विद्यापीठ ते नाशिकरोड (सकाळी नऊ ते दहा) या काळात तीन फेऱ्या होतील. याशिवाय सकाळी १० ते ११ या वेळेत नाशिकरोड ते मुक्त विद्यापीठ (दीक्षांत सोहळा ठिकाण थांबा) अशा बसफेऱ्या होतील. दीक्षांत सोहळा संपल्यानंतर दुपारी अडीच ते साडेतीन मुक्त विद्यापीठ ते नाशिकरोड, दुपारी साडेतीन ते साडेचार (नाशिकरोड ते मुक्त विद्यापीठ), दुपारी साडेचार ते पाच या वेळेत विद्यापीठ ते निमाणी डेपो अशा बस धावतील. अशीच व्यवस्था सकाळी आठ वाजेपासून मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) येथून सकाळी आठपासून उपलब्ध असेल. सकाळी आठ ते १० वाजेपर्यंत सीबीएस ते मुक्त विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठ ते सीबीएस अशा बसच्या पाच फेऱ्या होणार आहेत. दीक्षांत सोहळा संपल्यानंतर दुपारी अडीच ते चार वाजेपर्यंत मुक्त विद्यापीठ ते सीबीएस आणि साडेचार वाजता मुक्त विद्यापीठ ते निमाणी डेपो अशी बसची व्यवस्था असणार आहे.