आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज नाशिकमध्ये करोना उपाययोजना संदर्भात बैठक घेतली. यावेळी मालेगावमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासंबंधी विशेष चर्चा करण्यात आली. यासंबंधी बोलताना राजेश टोपे यांनी मालेगावमधील खासगी रुग्णालयांनी काम करण्यास नकार दिला तर त्यांचे परवाने रद्द केले जातील असा इशारा दिला आहे. बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्यधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

राजेश टोपे यांनी सांगितलं आहे की, “मालेगावमधील परिस्थिती समजून घेण्यासाठी आपण नाशिकमध्ये आलो आहोत. मालेगावात बरंच लक्ष देण्याची गरज आहे. नाशिकमधील चांगले आरोग्य कर्मचारी यांना मालेगावात पाठवत आहोत. तिथे २०० खाटांच्या बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. सोबतच मालेगवामधील खासगी रुग्णालयं सुरु झालीच पाहिजेत. यासंबधी मी जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन जाऊन सांगणार आहे. अन्यथा त्यांचे परवाने रद्द करणार”.

आणखी वाचा- मुंबईत ८३ टक्के रुग्णांमध्ये करोनाची लक्षणं नाहीत, राजेश टोपे यांची माहिती

मालेगावमधील परिस्थितीवर बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, “दाटीवाटीची जागा असल्याने अनेक ठिकाणी लोकाना घरात क्वारंटाइन होणं शक्य नाही. पण शक्य आहे तिथे संस्थात्मक क्वारंटाइन केलं जाव अशी सूचना जिल्हाधिऱ्यांना दिली आहे”.

“२०० खाटांचं रुग्णालय करोनासाठी वापरलं जाणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर, नर्स जे पोस्टिंग केल्यानंतरही गेलेले नाहीत त्यांना २४ तास दिले आहेत. जर ते जॉईन झाले नाहीत तर निलंबन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. जायचंच नाही हा दृष्टीकोन योग्य नाही,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- करोनाचा लढा देण्यासाठी मुंबईप्रमाणेच मालेगावातही टास्क फोर्स- राजेश टोपे

“अज्ञानीपणामुळेही अनेकदा मृत्यू होत आहेत. त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. जे १२ मृत्यू झाले आहेत त्यांचा दाखल झाल्यानंतर २४ तासात मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयांना सरकार पीपीई किट देणार आहे. खासगी रुग्णालयांनी सहकार्य करण्यास नकार दिला तर कठोर कारवाई करावी लागेल. मालेगाव मिशन आपल्याला यशस्वी करायचं आहे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत. “मालेगावात काही ठराविक कुटुंबात फैलाव झाला आहे. सगळीकडे झालं आहे असं नाही. नाशिक शहर, ग्रामीण, येवला देखील नियंत्रणात आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.