नाशिक : जिल्ह्य़ात गुरूवारी सायंकाळपर्यंत करोनाच्या २८ नव्या रुग्णांची भर पडल्याने रूग्ण संख्या दोन हजार ५८० झाली आहे. उपचार सुरू असतांना १४२ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. ग्रामीण भागातील करोनाचा विळखा सोडविण्यासाठी आरोग्य विभागाने ‘त्रिस्तरीय’ यंत्रणेवर भर देत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा परिसरात रुग्ण संख्या वाढ नियंत्रणात न आल्यास रुग्णांवर उपचार करण्यासाठी सहा ठिकाणी रुग्णालये अधिग्रहित करण्यात येणार आहेत.

गुरूवारी सायंकाळपर्यंत मालेगावात नऊ, तर जिल्ह्य़ाच्या उर्वरित भागात १९ नवी रुग्ण आढळले. मालेगाव पोलीस ठाणे, मनमाड, सिन्नर तालुक्यातील टेंभुरवाडी, पाचोरे गल्ली,  चांदवडमधील आयटीआय रस्ता परिसर, इगतपुरी येथील धोबी गल्ली, जाखोरी, देवळालीचा आनंदरोड, नांदगाव, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी तालुक्यातील निळवंडी, पालखेड, येवला, समनेर, मालेगाव कॅम्प या ठिकाणचे नवीन रूग्ण आहेत. करोनाची ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्य विभागाने त्रिस्तरीय कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती करोना कक्ष नियंत्रण प्रमुख डॉ. अनंत पवार यांनी दिली.

सध्य स्थितीत जिल्ह्य़ात करोनाग्रस्तांसाठी कोविड केअर केंद्र, डेलिकेट कोविड हेल्थ सेंटर, डेलिकेट कोविड रूग्णालय यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. प्राथमिक टप्प्यात पहिल्या कोविड केअर केंद्रात १०० खाटांची व्यवस्था असून करोनासदृश्य लक्षणे, लक्षणे नसलेले तसेच करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. त्यात जर कोणाची प्राणवायू घेण्याची क्षमता कमी आढळली तर त्याला तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात अन्य ठिकाणी हलविण्यात येते. सद्यस्थितीत जिल्ह्य़ात चांदवड येथील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, येवला येथील नगरसूल ग्रामीण रुग्णालय, देवळाली छावणी मंडळ, सिन्नर येथील नवीन ग्रामीण रुग्णालयाची इमारत, अभोणा ग्रामीण रुग्णालय, त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय, डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात काम सुरू आहे. तसेच मालेगाव ग्रामीणसाठी झोडगे ग्रामीण रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात रुग्ण संख्येचा आलेख वाढत राहिला तर इगतपुरी ट्रामा केअर सेंटरची इमारत, वणी ट्रामा केअर सेंटरची इमारत, कळवण उपजिल्हा रुग्णालयातील नवजात शिशुंसाठी असलेला अतिदक्षता कक्ष हा गरोदर मातांसाठी आरक्षित करण्यात येईल. तसेच मनमाड येथील करूणा ट्रस्ट हॉस्पिटल, पेठ येथील नीलवसंत वैद्यकीय रुग्णालयात व्यवस्था करण्यात येणार आहे.