‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत वायुवेगाने सर्वेक्षण

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

Trigrahi Yog in Aries
त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ ५ राशींना होणार अपार धनलाभ? ३ ग्रहांच्या युतीने लक्ष्मी येऊ शकते दारी
Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
Trigrahi Yog in Meen Rashi
३ ग्रहांची महायुती होताच घडणार त्रिग्रही योग; ‘या’ राशींचे चमकणार भाग्य? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 

नाशिक : घरात सदस्य किती ?.. त्यांची नावे, वय आणि भ्रमणध्वनी क्रमांक काय ?.. कोणाला काही आजार आहे काय ?.. अवघ्या मिनीटभरात ही सर्व माहिती टिपली की, पहिली फेरी झाली. पिवळ्या रंगातील स्टिकर दरवाजावर चिकटविले जातात. ना प्राणवायूची तपासणी, ना शरीरातील तापमापनाची. मोठा गाजावाजा करत शहरात सुरू झालेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत घरोघरी सर्वेक्षण अशा धाटणीने होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अनेक घरांमध्ये यापूर्वी सकारात्मक रुग्ण आढळले. अन्य आजार असणारे, ज्येष्ठ व्यक्ती काही ठिकाणी असतात. परंतु, सर्वेक्षक चटकन मिळेल ती माहिती घेऊन, कुठलीही तपासणी न करता पुढे मार्गस्थ होत असल्याने या मोहिमेतून नेमके काय साध्य होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

करोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेची अंमलबजावणी सहा विभागांत सुरू झाली आहे. त्याअंतर्गत शहरातील सर्वच म्हणजे साडेचार लाख घरांतील १९ लाख नागरिकांची तपासणी करण्याचे नियोजन आहे. करोनाच्या लक्षणाबरोबर सारी, इली या आजारांसह अन्य आजारांच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे खुद्द महापालिकेने जाहीर केले. यासाठी अंगणवाडी सेविका, पालिका शाळेतील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरेशी सुरक्षा साधने दिली जात नसल्याने दोन्ही घटकांचा सर्वेक्षणाच्या कामास विरोध होता. अंगणवाडी सेविकांनी तर सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेले भ्रमणध्वनी नसल्याचे कारण दिले होते. शाळांमधील ऑनलाइन वर्ग सांभाळून हे सर्वेक्षण करण्यास पालिका शाळेतील शिक्षकही तयार नव्हते. कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिल्यानंतर सुरू झालेले हे सर्वेक्षण विशेष गंभीरपणे होत नसल्याचे चित्र आहे.

करोना नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. दोन टप्प्यांत ती पार पडेल. पहिल्या टप्प्यात पथके घरांना भेट देऊन करोनासह सारी, इली या आजारांसोबत इतर रुग्ण शोधण्याचे काम करतील.

मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड विकार, अवयव प्रत्यारोपण, दमा आदी आजारांबाबत माहिती संकलित करण्याचे जाहीर करण्यात आले होते. ‘थर्मल गन’द्वारे शरीरातील ताप आणि प्राणवायूची पातळी मोजणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी तसे काहीच घडत नाही. सर्वेक्षक अनिच्छेने काम करताना दिसतात. त्याचा परिणाम संशयित रुग्ण सापडणे दूर, शिवाय आवश्यक ती माहिती न मिळण्यात होईल, असे जागरूक नागरिकांना वाटते. इमारतीत प्रवेश करणारे पथक अवघ्या काही वेळात सर्व घरांमधील माहिती घेऊन दैनंदिन लक्ष्य पूर्ण करते. तळमजल्यावरील रहिवाशांना वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांचे नाव वा तत्सम माहिती विचारली जाते. उच्चभ्रू वसाहतीत घरच्या ऑक्सिमीटरवर काय पातळी होती याची काही ठिकाणी विचारणा झाली. काहींना वरच्या मजल्यावरून खाली येण्यास सांगून पथक पुढे निघून गेले, असेही अनुभव आहेत. ज्या घरात सकारात्मक रुग्ण होते, तिथे अनेक ठिकाणी महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्राचे स्टिकरदेखील लावले नव्हते. सर्वेक्षणात कोणाला मागील महिन्यात काही लक्षणे दिसली का, कोणी बाधित होते का याचीदेखील विचारणा करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या एकंदर स्थितीमुळे पथकांकडे आवश्यक ती सामग्री दिली गेली की नाही, याविषयी संशय वाढला आहे. ऑक्सिमीटर, तापमापक तसेच तत्सम साहित्य न देता पथकांना धाडले गेल्याची काहींना शंका आहे.

एकत्रित मनुष्यबळ एकसारखे काम करणारे नसते. त्यामुळे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सर्वेक्षणात काही त्रुटी असू शकतात. मोहिमेचा दुसरा टप्पा अधिक प्रभावीपणे राबविला जााईल. तत्पूर्वी, या मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. शिक्षकवर्ग या उपक्रमात सहभागी होण्यास तयार नव्हता. परंतु, सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिल्यानंतर ते सहभागी झाले आहेत. पुढील काळात सामाजिक संस्थांना सहभागी करून घेतले जाईल. करोनासोबत जगायचे आहे याबद्दल सर्व पातळीवर जनजागृती आवश्यक आहे.
– कैलास जाधव (आयुक्त, महापालिका)