मनमाड : नागपूर -पुणे या मनमाडमार्गे सोमवारपासून दररोज नियमित धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण रविवारी सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या गाडीत एकूण सात खुर्ची यान आणि एक विशेष आरामदायी व्यवस्था असणारे अर्थात ‘एक्झिक्युटीव्ह’ खुर्चीयान असे एकूण आठ डबे असतील. त्यात खुर्चीयान बोगीत ५४६ तर, विशेष आरामदायी व प्रशस्त आसन व्यवस्थेच्या बोगीत ४४ आसने अशी एकूण ५९० प्रवाशांची बसण्याची क्षमता असणार आहे.
वंदे भारत विशेष गाडीच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे भुसावळ विभागात मनमाड रेल्वे स्थानकावर होईल. उद्घाटनानंतर लगेचच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून व रेल्वे ॲपवरून प्रवाशांसाठी आरक्षण सेवा सुरू केली जाईल. देशातील सर्वाधिक लांब पल्ल्याची ही रेल्वेगाडी असेल. प्रतिताशी ७३ किलोमीटर वेगाने ती मार्गक्रमण करेल. या माध्यमातून आरामदायी व जलद प्रवासाची अनुभूती प्रवाशांना मिळणार आहे.
या गाडीसाठी मनमाड ते पुणे प्रवासासाठी तिकीट आरक्षण व सुपरफास्ट शुल्कासह (जीएसटी) खुर्चीयान बोगीत ९६० रूपये तर, विशेष आरामदायी खुर्चीयान बोगीत भाडे १९५० रूपये असणार आहे. वंदे भारतमधील प्रवासात चहा किंवा कॉफीसाठी १५ रूपये, नाश्ता १२० ते १६० रूपये आणि भोजनासाठी २२० ते २६० रूपयांपर्यंत मोजावे लागतील.
वेळापत्रक…
अजनी (नागपूर) येथून सकाळी ९.५० ला सुटणारी ही रेल्वे वर्धा येथे १०.४०, बडनेरा येथे १२.०३, अकोला येथे १३.००, भुसावळ येथे १४.५५, जळगांव १५.२६, मनमाड १७. २६, कोपरगांव येथे १८.२०, अहिल्यानगर येथे १९.३५, दौंड कॉर्ड २०.४३, तर पुण्याला २१.५० ला पोहचेल. तर पुणे येथून सकाळी ६.२५ ला सुटणारी वंदे भारत दौंड कॉर्ड ०७.२५, अहिल्यानगर ०८.३३, कोपरगाव ०९.५३, मनमाड १०.३०, जळगांव १२.३५, भुसावळ १३.०५, अकोला १५.०३, बडनेरा १६.१३, वर्धा १७.२५, तर अजनी (नागपूर) येथे सायंकाळी १८.२५ वाजता पोहचेल.
’वंदे भारत’ची वैशिष्ट्ये
प्रवाशांसाठी या विशेष गाडीत वातानुकूलित डबे, स्वयंचलीत तापमान नियंत्रण, दीर्घ प्रवासासाठी आरामदायक बसण्याची व्यवस्था, एलईडी व वातानुकूलन प्रकाश व्यवस्था, आपोआप उघडणारे दरवाजे, मोठी पारदर्शक खिडकी आदी सुविधा आहेत. या शिवाय गाडीतील शौचालये आधुनिक व आरामदायक आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी संवेदक आणि स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली आहे.