नाशिक: महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे ‘वसुंधरा सप्ताह’ अंतर्गत सहा विभागात उद्यान विभागाकडून वृक्ष लागवड करण्यासह खिळेमुक्त वृक्ष अभियान राबविण्यात आले. झाडांवर अनधिकृतरित्या खिळे ठोकणाऱ्या २० हून अधिक आस्थापनांविरूध्द गुन्हे दाखल करुन दंड ठोठावण्यात आला.

वसुंधरा सप्ताहात महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने ‘अर्थ विक’ घोषित केला आहे. त्यानुसार ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गंत मनपाकडून पर्यावरण संवर्धन करण्याकरीता विविध उपक्रम राबविले गेले. महापालिकेच्या सहा विभागात उद्यान विभागाकडून वृक्ष लागवड करुन अभियानाचा समारोप झाला. या सप्ताहात मनपाच्या सहाही विभागांतर्गत ‘खिळे मुक्त वृक्ष’ अभियान राबविण्यात आले. १० हजार पेक्षा अधिक वृक्ष खिळे मुक्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा… मे महिन्यात मनमाडकरांना २१ दिवसाआड पाणी, पालिकेचे नियोजन

वृक्षावर खिळे ठोकून अनधिकृतरीत्या जाहिरात करणा-या २० हून अधिक आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करून दंडाची कारवाई करण्यात आली. झाडांवरील खिळे काढण्याची ही मोहीम यापुढेही सुरुच राहणार असून झाडांवर खिळे ठोकून फलक लावणा-यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा मनपाच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने दिला आहे.

हेही वाचा… भुवन आश्रमशाळा अत्याचार प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल, कारवाईची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सप्ताहात पंचवटी उद्यान विभाग अंतर्गंत पेठ फाटा येथील नाल्यातील प्लास्टिक जमा करुन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याशिवाय पश्चिम विभाग उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे कृषिनगर जॉगींग ट्रॅक येथे शालेय गटातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद मिळाला. विविध शाळेच्या ५०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ‘माझी जबाबदारी’ हा स्पर्धेचा विषय होता. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निर्देशाने उद्यान विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान निरीक्षक आणि इतर कर्मचारी यांनी सदरचे उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी परीश्रम घेतले.