धुळे : लोकसभा निवडणुकीत याच मतदार याद्यांच्या आधारे विरोधकांना विजय मिळाला तेव्हा त्या योग्य वाटल्या; अशा शब्दात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांच्या मतदार याद्या दुरुस्तीवरील आरोपांना प्रत्युत्तर देत जोरदार पलटवार केला. पिंपळनेर (ता. साक्री) येथे झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण व शाखा उद्घाटन तसेच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी मंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. या दौऱ्या दरम्यान झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री दादाभुसे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत याच मतदार याद्यांच्या आधारे विरोधकांना विजय मिळाला होता, तेव्हा त्या योग्य वाटल्या; मात्र विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर त्याच याद्यांवर शंका घेणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, तरुण, शेतकरी आणि जनतेने विरोधकांना स्पष्ट संदेश दिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये पराभव निश्चित असल्याचे जाणूनच विरोधक मतदार याद्यांच्या नावाखाली खोटा प्रचार करत आहेत. निवडणुका निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पडतात. त्यामुळे मतदार याद्यांवर शंका उपस्थित करणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण करणे होय.
नाशिक आणि जळगाव येथील सभांमध्येही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लोकशाहीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले होते. मतदान प्रक्रिया ही भारताच्या संविधानाने दिलेली सर्वात मोठी शक्ती आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवणे म्हणजेच लोकशाहीचा आदर आहे. या पवित्र प्रक्रियेवर वारंवार संशय घेणे योग्य नाही, असे भुसे यांनी ठामपणे म्हटले होते. जनतेच्या मताचा आणि निवडणूक आयोगाच्या कामाचा सन्मान राखणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. ही पार्श्वभूमी पाहता मंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणाचा दांडपट्टा साक्री दौऱ्यातही कायम ठेवला.
निवडणुका म्हणजे जनतेच्या विश्वासाचा आरसा आहे. ज्यांना जनता नाकारते त्यांनी ईव्हीएम किंवा मतदार याद्यांना दोष न देता आत्मपरीक्षण करावे. पराभवाचे कारण मतदार यादीत नव्हे, तर जनतेच्या मनात शोधावे. सत्ता येते आणि जाते, पण लोकशाहीचा पाया मजबूत राहिला पाहिजे. खोट्या माहितीपासून सावध राहावे आणि विकासावर आधारित राजकारणाला पाठिंबा द्यावा. राज्याचा सर्वांगीण विकास आणि शिक्षण क्षेत्राची उन्नती हेच आपले ध्येय आहे असे आवाहन शेवटी भुसे यांनी जनतेला उद्देशून केले. विकास आणि लोकाभिमुख धोरणे घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि जनता त्यालाच प्रतिसाद देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
