नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे लवकरच दादासाहेब फाळके चित्रनगरी साकारण्यात येणार असून त्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनानंतर बैठक घेण्याचे आश्वासन येथील राष्ट्रवादी (अजित पवार) चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश चिटणीस आदित्य संजयराव यांना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिले.
अजित पवार गटाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आदित्य संजयराव यांनी मंत्री शेलार यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत अनेक मुद्दे मांडण्यात आले. मुंढेगाव येथे प्रस्तावित चित्रनगरी प्रकल्पाविषयीही चर्चा करण्यात आली. महसूल खात्याच्या नावावर असलेली जमीन सांस्कृतिक खात्याच्या नावावर करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारली गेल्यास चित्रपट निर्मिती संस्थांना चित्रिकरणासाठी योग्य जागा उपलब्ध होईल. हे ठिकाण पाच जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती असल्याने चित्रिकरणासाठी आवश्यक सोयीसुविधा, दळणवळण व्यवस्था, पूर्व-निर्मिती व पश्चात निर्मिती व्यवस्था सहज उपलब्ध होतील. जिल्ह्यातील युवकांना तसेच कलाकारांना संधी मिळेल. इगतपुरीच्या विकासाला चालना मिळेल. समृद्धी महामार्गामुळे मुंबई- इगतपुरी अंतर जवळपास एक तासाने कमी झाल्याने मुंबईतील कलाकारांना इगतपुरीत येणे सहज शक्य होईल, असे मुद्दे बैठकीत मांडण्यात आले.
यावेळी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष नितीन धावणे, प्रदेश चिटणीस अभिनेत्री अपेक्षा चव्हाण, प्रदेश सरचिटणीस मोहित नारायणगावकर हेही उपस्थित होते.
चित्रपटनगरीसाठी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. दादासाहेब फाळके यांच्या नावाने नाशिकमध्ये चित्रपटनगरी असावी, अशी अनेक वर्षांची इच्छा आहे. – आदित्य संजयराव (प्रदेश चिटणीस, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग)