जळगाव : रावेर तालुक्यातील शेतशिवारांमध्ये चोरट्यांसह माथेफिरूंचा धुडगूस सुरू आहे. सावदा-रावेर रस्त्यावरील वडगावनजीक तीन शेतांमधील केळीची सुमारे चार हजारांवर खोडे माथेफिरूंनी कापत नुकसान केले. यात शेतकर्‍यांचे १० लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन करीत रोष व्यक्त केला. माथेफिरूंना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील शेतशिवारांमध्ये चोरट्यांसह माथेफिरूंचा धुडगूस सुरूच आहे. मध्यंतरी कापूसचोरीसह कृषी साहित्यचोरीच्या घटनाही नित्याच्याच झाल्या आहेत. काही ठिकाणी शेतकर्‍यांनीच कापूस चोरट्यांना रंगेहात पकडले होते. वडगावनजीक तीन शेतांमधील केळीची सुमारे चार हजार खोडे माथेफिरूंनी कापून नुकसान केले. चिनावल येथील पंकज नारखेडे यांची केळीची सुमारे दोन हजार खोडे, वडगाव येथील दगडू पाटील यांची सुमारे अडीच हजार खोडे, डॉ. मनोहर पाटील यांच्या शेतातील तीनशे खोडे कापण्यात आली. हा प्रकार समजताच परिसरातील चिनावल, वडगाव, निंभोरा, वाघोदा, विवरा येथील शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेत तिथेच रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

हेही वाचा >>> नाशिक : जिंदाल कंपनीच्या भीषण आगीत ११ कामगार गंभीर जखमी, बचावकार्य सुरूच; २५ रुग्णवाहिका तैनात!

वाघोदा चौफुलीवरही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी आंदोलक शेतकर्‍यांची भेट घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत चर्चा केली आणि आंदोलनाचा इशारा दिला. शेतशिवारातील केळीसह अन्य पिके कापून फेकण्याचे प्रकार वाढले आहेत. शेतकरी त्यामुळे जेरीस आले आहेत. पोलीस प्रशासन चोरट्यांना पकडण्याऐवजी त्यांना का घाबरतात, असा प्रश्‍न आमदार चौधरी यांनी उपस्थित केला. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damage 4000 trunks in banana plantations with thieves of farmers damage nashik news ysh
First published on: 01-01-2023 at 16:30 IST