नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात बंडखोरीचे निशाण फडकावणारे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर कुटुंबाकडे तब्बल पावणेतीन कोटींचे ३९३० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. या कुटुंबाची एकूण संपत्ती २८ कोटीहून अधिक आहे. करंजकर यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या विवरण पत्रातून त्यांची श्रीमंती उघड झाली आहे. करंजकर यांचे वार्षिक उत्पन्न साडेदहा लाखाच्या आसपास आहे. त्यांच्याविरूद्ध सात गुन्हे दाखल असून सात खटले विविध न्यायालयात प्रलंबित आहेत.

करंजकर कुटुंबाकडे तीन कोटी ९१ लाखाची चल तर, २४ कोटी ७९ लाखांची अचल संपत्ती आहे. स्वत: विजय करंजकर यांच्याकडे २४३० ग्रॅमचे (एक कोटी ७० लाख) तर पत्नी अनिता करंजकर यांच्याकडे १५०० ग्रॅमचे (एक कोटी पाच लाख) सोन्याचे दागिने आहेत. कुटुंबाकडे २२ लाखाची पाच वाहने आहेत. वारसा हक्काने प्राप्त झालेल्या आणि स्वत: खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेचे सध्याचे बाजारमूल्य २४ कोटी ७९ लाखांहून अधिक आहे.

हेही वाचा…शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात; कार्यकर्ते सुखरूप

करण गायकर यांच्याकडे २४ लाखांचे दागिने

नाशिक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर कुटुंबाकडे ६४ लाखाची चल संपत्ती असून स्थावर मालमत्ता अर्थात अचल संपत्तीचे मूल्य एक कोटी १७ लाखांच्या घरात आहे. या कुटुंबाकडे सुमारे २४ लाखाचे ३३ तोळे सोन्याचे दागिने आहेत. गायकर यांच्याविरुध्द तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यात डोंगरे वसतिगृह मैदानावर कार्यक्रम आयोजनासाठी खंडणी मागितल्या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तर आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने मुंबई नाका पोलीस ठाणे आणि करोना काळात करोना योद्धा सत्कार या तक्रारींचा समावेश आहे. जिल्हा न्यायालयात तीन खटले प्रलंबित आहेत.