सेना-भाजप-रिपाइं महायुतीविषयी कितीही चर्चा सुरू असली तरी विधानसभा निवडणुकीत महायुती होणारच आहे. निवडणुकीच्या जागा वाटपात रिपाइंने १० जागांची मागणी केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना त्यांनी रिपाइंमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. भुजबळांनी रिपाइंची वाट धरावी. दलित-ओबीसींना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. युती विरोधात कितीही चर्चा होत असल्या तरी युती होणारच, असे त्यांनी सांगितले. युती तुटल्यास रिपाइं भाजपसोबत राहील. मात्र, शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यांनाही सोबत घेतले जाईल. भाजपचे मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे. १८ जागा मित्रपक्षांना देण्याची मागणी करण्यात आली असून रिपाइंने १० जागा मागितल्या आहेत. राज्यात सर्वपक्षीयांची यात्रा सुरू असल्याने आपण राज्यात यात्रा काढली नाही. आपली देशभर यात्रा सुरू असल्याचे आठवले यांनी सांगितले. मुलींच्या सुरक्षिततेबाबत सरकार गंभीर असल्याचे आठवले यांनी नमूद केले.