जळगाव – जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यूच्या साथीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने पाहणी करीत शर्थीचे प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.जिल्ह्यातील डेंग्यू साथीच्या प्रादुर्भावाचा आढावा जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी काही सूचना केल्या. घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका.

डबक्यांच्या स्वरूपात जमा झालेले पाणी प्रवाहित करा अथवा त्यावर माती टाकून खड्डे बुजवावेत. ही कार्यवाही ग्रामपंचायत, नगरपालिका , महापालिका प्रशासनाद्वारे करावी. नदी, नाले, तलाव, विहिरी अशी कायमस्वरूपी पाण्याचे स्त्रोत असलेली ठिकाणे; परंतु जिथे स्वच्छ पाणी साचून आहे, अशी ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे गप्पी मासे सोडावीत. आशा स्वयंसेविकांद्वारे सर्वेक्षण करावे. डास व्युत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत. परिसरात डास निर्मूलनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांच्याद्वारे फवारणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा >>>शिक्षक देता का कोणी…? धुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन

तापाची लक्षणे जाणवणार्या शंभर टक्के रुग्णांची डेंग्यू आजाराची तपासणी करावी. सूचनांचे पालन न झाल्यास दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचना देत डेंग्यू साथीचा प्रसार झाल्याची अतिजोखमीची २० ठिकाणे तपासणीत निष्पन्न झाली असून, तेथे नागरिकांनी अतिदक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.