“नाशिक महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. राज्यातील सत्ता गेल्याने वर्षभर कामे रखडली. विकास कामांसाठी निधी देतांना राज्य सरकारकडून भेदभाव केला जातो. आवश्यक तो निधी मिळत नसल्याने केंद्र सरकारकडून निधी आणून विकास कामे मार्गी लावली जात आहे,” असा दावा माजीमंत्री आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले. नाशिकच्या मेट्रो निओ प्रकल्पासाठी प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. या प्रकल्पात निदर्शनास आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून अंतिम अहवाल तयार केला जाईल, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन महाजन, आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते शनिवारी झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाला. महाकवी कालिदास कला मंदिरातील मुख्य कार्यक्रम करोनामुळे रद्द करण्यात आला. तथापि, विविध भागात काही विकास कामांचा प्रातिनिधिक स्वरुपात शुभारंभ करण्यात आला. दिंडोरी रस्त्यावरील वज्रेश्वरीनगर येथील कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांची गर्दी झाली होती. सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले गेले नाही. काहींनी मास्क लावलेले नव्हते. या कार्यक्रमानंतर महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेवर टिकास्त्र सोडले.

“शहरात ३५० कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. करोनाचे नियम पाळून हे थोडक्यात कार्यक्रम झाल्याचे त्यांनी नमूद केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना दिलेला शब्द पाळला. राज्यातील सत्ता गेल्यामुळे वर्षभरात कामे रखडली होती. केंद्र सरकारच्या मदतीने ही कामे सुरू करण्यात आली. मेट्रो निओ प्रकल्पासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली. सूरत-चेन्नई हरित महामार्ग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. शहरात घरोघरी गॅस पुरवठा करणाऱ्या वाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. उद्योजक मुकेश अंबानी हे देशातील अतिशय मोठे उद्योगपती. देशासाठी अत्यंत महत्वाची व्यक्ती. त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते हे चिंताजनक आहे. प्रत्येक घटनेत सचिन वाझे यांची उपस्थिती कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची ‘एनआयएन’कडून चौकशीची मागणी महाजन यांनी केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवाढ झाल्यामुळे इंधनाच्या दरात वाढ झाली. राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करून दिलासा देण्याची गरज आहे. राम मंदिरासाठी भाजप कुठेही वर्गणी गोळा करीत नाही. न्यास आणि विहिंप यांना आम्ही मदत करतो, असेही महाजन यांनी सांगितले. भाजप खंडण्या घेत नाही, फेरीवाल्यांकडून वसुली करीत नसल्याचा टोला त्यांनी सेनेला लगावला. १२ आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीच्या प्रश्नावर त्यांनी हा राज्यपालांचा प्रश्न असल्याचे सांगितले.

निकालातून शिवसेनेला उत्तर

महापालिका निवडणुकीत १०० हून अधिक जागा मिळविण्याचा दावा शिवसेना करीत आहे. मात्र, भाजपने केलेली कामे, निकाल त्यांना उत्तर देईल. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चाललेल्या पक्षांतराबाबत कोणीही गेले तरी फरक पडणार नसल्याचे महाजन यांनी सांगितले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुखपट्टी वापरत नाही. परंतु, आपण मुखपट्टी वापरतो. राज आणि आमचे विचार मिळतेजुळते आहेत. मात्र, मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे महाजन यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development fund thackeray sarakar girish mahajan maharashtra politics bmh
First published on: 07-03-2021 at 14:34 IST