नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसूचना न देता दर्शन व्यवस्थेत बदल केल्याने वाद उदभवल्यानंतर सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, पुन्हा असा प्रकार उदभवू नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपर्यंत देणगी दर्शन बंद ठेवले आहे. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने १८ ऑगस्ट रोजी पहाटे चारपासून भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले होईल. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने दिवसभर भाविकांची गर्दी कायम होती.

श्रावणात शिवभक्तीला विशेष महत्व आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येत आहेत. १५ ऑगस्टपासून सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने शुक्रवारपासून भाविकांच्या गर्दीत अधिकच वाढ झाली. गर्दी वाढल्यास मंदिर व्यवस्थापनाकडून व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याचे याआधीही दिसून आले आहे. शनिवारी पुन्हा तोच अनुभव आला. दुपारच्या सुमारास अचानक गर्दी वाढली. यामध्ये दक्षिण भारतीय भाविकांची संख्या अधिक होती. देवस्थान परिसरात दर्शन रांगेत होणारी गर्दी पाहता काही विश्वस्तांनी कुठल्याही प्रकारची पूर्वसुचना किंवा चर्चा न करता भाविकांच्या सोयीसाठी मुखदर्शन सुरू केले. उत्तर दरवाजा बंद केला गेला. हा दरवाजा बंद झाल्याने भाविकांचा संताप झाला. रांगेत चार ते पाच हजार भाविक असतांना दरवाजा का बंद केला, अशी ओरड करत काही भाविकांनी सुरक्षारक्षकांशी वाद घातला. शाब्दिक चकमकीचे रुपांतर मारहाणीत झाले. सुरक्षारक्षकांकडून काही भाविकांना मारहाण करण्यात आल्याची चित्रफीत फिरली. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन कोंडीत सापडले.

नेमके काय झाले ?

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा पाहता व्यवस्थापनाने मुखदर्शन सुरू केले. गाभाऱ्यापर्यंत न नेता मंदिराच्या आवारात असलेल्या शिवमूर्ती, शिवलिंगाचे दर्शन सुरू केले. यामुळे काही भाविकांना देवस्थानच्या आवारात प्रवेश मिळाला. परंतु, पुढे दर्शन न घेता बाहेर काढून देण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे भाविकांच्या लक्षात आले. दुसरीकडे विश्वस्थांच्या ओळखीतील काहींना गर्दी असतांनाही गाभाऱ्यापर्यंत जाता येत होते. याला काहींनी विरोध करायचा प्रयत्न केला. भाविकांच्या भावना लक्षात घेता देवस्थानने मुखदर्शन बंद करण्यासाठी दरवाजा बंद केला. आणि बाहेरील भाविकांनी त्यास विरोध केल्याने गोंधळ झाला.

सुरक्षारक्षकांचा संयम सुटला

सुरक्षा रक्षकांनी भाविकांना पुढील दोन तासात दर्शन होईल, असे सांगितले. मात्र भाविकांनी दरवाजा बंद ठेवल्याने देवस्थानच्या मुख्य दरवाजाला लाथा मारण्यास सुरूवात केली. सुरक्षारक्षकांनी समजावण्यास सुरूवात केली. परंतु, भाविक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी शिवीगाळ करत दरवाजांवर बाटल्या मारून फेकल्या, सुरक्षारक्षकाला मारहाण केली. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर सुरक्षारक्षकांचा संयम सुटला आणि त्यांनी मारहाण केली. – मनोज थेटे (अध्यक्ष, पुरोहित संघ, देवस्थान विश्वस्थ)

वेगवेगळ्या भाषांमधील फलकांची गरज

त्र्यंबकेश्वर येथे दक्षिण भारतासह वेगवेगळ्या राज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. या गर्दीला स्थानिक मराठी आणि हिंदी भाषाही समजत नाही. अशा स्थितीत देवस्थानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सूचना, माहिती वेगवेगळ्या भाषेत मिळणे गरजेचे असतांना देवस्थान यासाठी कुठलेही प्रयत्न करतांना दिसत नाही. मराठी आणि इंग्रजी फलक त्यातही काही मोजक्या ठिकाणी लावल्याने परप्रांतीय भाविकांची तारांबळ उडते.