लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुमारे दीड-दोन लाख लोकसंख्येच्या धरणगाव या तालुक्याच्या शहरात गेल्या २२ दिवसांपासून पाणीपुरवठाच झाला नाही. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी कामे सोडून वणवण भटकंती करावी लागत आहे. जलकुंभाला लागलेल्या गळती काढण्याचे काम सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या २५ वर्षांपासून पाण्याची समस्या जैसे थेच आहे. महिनाभरात दोन तास पाणी मिळाल्याची व्यथा धरणगावकरांनी मांडली.

उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना दुसरीकडे नागरिक पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. सध्या धरणगावकर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. पाणी आणायच्या कामात लहान मुलांचीही मदत घेतली जात आहे.

हेही वाचा… नाशिक: बड्या थकबाकीदारांचे आता गावोगावी फलक

सोमवारी (8 मे) शहरातील मलाकली गल्ली, बेलदार गल्ली, पिल्लू मस्जीद या गल्लीतील महिलांनी पालिकेवर धडक दिली. मात्र, मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी न भेटल्याने पालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात एक एप्रिलपासून दोन दिवसांआड पाणी देऊ, असे आश्‍वासित केले होते. मात्र, मे महिना सुरू होऊनही २२ दिवसांपासून पाणी नाही, तर तो एप्रिल फुल होता का, असा प्रश्‍न यावेळी महिलांनी उपस्थित करून पाणीपुरवठामंत्री पाटील यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या २५ वर्षांपासून पाणीप्रश्‍न कायमच असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. वाघ यांनी थेट पालिका गाठली. त्यांनी महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या.

हेही वाचा… फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव राज ठाकरे का घेत नाही- छगन भुजबळ यांचा प्रश्न

पाणीपुरवठामंत्री मस्त, धरणगावकर त्रस्त – वाघ

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने वीस दिवसांपूर्वी मुख्याधिकारी पवार यांची भेट घेत पाणीप्रश्‍नासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे. आता २२ दिवस उलटूनही अधिकार्‍यांकडून पाणीप्रश्‍न सोडविला जात नाही. यासाठी जबाबदार कोण? पालकमंत्री जबाबदार नसतील तर त्यांचे मतदारसंघात लक्ष नसेल. पाणीपुरवठामंत्र्यांच्याच जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगावला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मंत्री मस्त, नागरिक त्रस्त असेच म्हणावे लागेल.

पालिकेवर प्रशासक असल्याने त्यांच्यावर अंकुश कोण ठेवणार? तू माझ्याकडे पाहा, मी तुझ्याकडे पाहतो, असे बोबाटपणे, सर्रासपणे सुरू आहे, असा घणाघात शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर पाणीप्रश्‍नावर केला. याप्रसंगी नगरसेवक जितेंद्र धनगर, संजय चौधरी, विनोद रोकडे आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.