धुळे – जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार ऋतिक उर्फ निक्की पंजाबी (२५) यास नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी निवडणुक, सण-उत्सवांच्या अनुषंगाने पंजाबी याच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती घेण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. समाज विघातक कृत्यांसह पंजाबीवर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांचीही नोंद असल्याने त्याच्यावर कठोर कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी या प्रस्तावात कायदेशीर तरतुदींची पडताळणी केल्यावर अधीक्षकांनी शिफारस केली होती.

रुतिक ऊर्फ निक्की पंजाबीने २०१९ पासून गुन्हेगारीस सुरुवात केली. त्याच्याविरुध्द धुळे जिल्ह्यातील मोहाडीनगर, देवपूर, आझादनगर आणि धुळे शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांनी भयमुक्त वातावरणात सण, उत्सव साजरा करण्यासह भयमुक्त जीवन जगण्यासाठी तसेच आगामी निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी अशी कारवाई करण्यात आली आहे. आगामी काळातही अशा कठोर कारवाया सुरूच ठेवण्यात येतील. – श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे)