धुळे : सत्तेत असलेल्या राजकीय पक्षात राहिल्यावरही मुस्लिम समाजाबद्दल वापरले जाणारे अपशब्द आपण थांबवू शकत नाहीत. त्यामुळे अशा पक्षात राहून उपयोग काय, असा उद्विग्न प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पदाधिकारी इर्शादभाई जहागीरदार यांनी आता एमआयएम (ऑल इंडिया मजलीस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन) मध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे इर्शादभाई यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी-समाजवादी पक्ष-राष्ट्रवादीनंतर आता एमआयएम असा होणार आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आपण सर्वच्या सर्व जागा पूर्ण ताकदीनिशी लढवू, असा दावा इर्शादभाई यांनी केला.

एमआयएम पक्षाचे प्रमुख खा.असुद्दीन ओवैसी हे ऑक्टोबर २०२५ मध्ये धुळे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात आपण एमआयएममध्ये जाहीर प्रवेश करू, असे इर्शादभाई यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) प्रदेश सरचिटणीस पदावर असतांना इर्शादभाई यांनी धुळे शहरातील अनेक लहान-मोठ्या वसाहतींमध्ये विंधन विहिरींची (हातपंप) कामे, विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि अन्य समाजोपयोगी कामे केली. यामुळे त्यांना अनेक राजकीय पक्षांनी आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतांना दांडगा जनसंपर्क झाल्यावरही पक्षाकडून हवा तसा न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत धुळे येथे झालेल्या जाहीर सभेत इर्शादभाई यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. परंतु, समाजवादी पक्षही त्यांना फारसा रुचला नाही. अवघ्या काही महिन्यातच समाजवादी पक्षातून ते बाहेर पडले. महायुतीतील सत्ताधारी राष्ट्रवादी (अजित पवार) मध्ये इर्शादभाई यांनी पुन्हा प्रवेश केला. परंतु, पहिल्यासारखे सक्रिय राहिले नाहीत.

दरम्यान,सत्ताधारी पक्षात राहूनही मुस्लिम धर्माबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना वठणीवर न आणता आणि नियंत्रणातही आणण्याचा प्रयत्न होत नसेल तर अशा ठिकाणी राहून आपण कोणतेही परिणामकारक आणि समाजोपयोगी कार्य करू शकणार नसल्याची जाणीव त्यांना झाली. तशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सत्ताधारी अजित पवार गटाबद्दल नाराजी व्यक्त करून इर्शादभाई यांनी आपण आगामी काळात एमआयएम पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. पक्षप्रमुख खा.असुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत आपण प्रवेश करू. सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पक्षाचे प्रमुख ओवैसी हे धुळे जिल्हा दौऱ्यावर येतील. यावेळी होणाऱ्या जाहीर सभेत आपला पक्ष प्रवेश होईल, असे ते म्हणाले.आपण यासाठी ओवैसी यांची त्यांच्या निवासस्थानी (हैद्राबाद) नुकतीच भेट घेतली, असे इर्शादभाई यांनी सांगितले. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सर्व जागांवर एमआयएमतर्फे उमेदवार दिले जातील. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून निवडणूक लढविली जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.