धुळे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आता साऱ्याच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले असून भेटीगाठी आणि पक्षाचे महत्व पटवून देण्यात येते आहे.या अनुषंगाने सत्ता मिळविण्यासाठी ’एकजुटीने लढा द्या’ असे आवाहन करून माजी केंद्रीय मंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना ’बुस्टर’ दिला.
धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्वाची आढावा बैठक काल राष्ट्रवादी भवन येथे माजी केंद्रीय मंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक जयसिंगराव गायकवाड पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पक्ष संघटनेची बळकटी आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागावर भर देण्यात आला. जयसिंगराव गायकवाड पाटील यांची अलीकडेच उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी निवड झाल्याने त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवउर्जा संचारली.
बैठकीदरम्यान जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रत्येक तालुका आणि विधानसभा क्षेत्रातील संघटनेचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने एकजुटीने लढा एकजुटीने लढा दिला पाहिजे.
जनतेच्या प्रश्नांवर काम करताना कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार घराघरात पोहोचवावेत, जनसंपर्क वाढवावा आणि युवकांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, पक्षाचा आत्मा म्हणजे कार्यकर्ता. कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर पक्षाची ओळख टिकून आहे. शरदचंद्र पवार यांच्या विचारसरणीवर चालत आपण समाजात विकासाचे कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी युवक, महिला आणि शेतकरी आघाड्यांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत रणजीत राजे भोसले, कामराज निकम, नरेंद्र तोरवणे, व्यंकटेश पाटील, विनोद बच्छाव, गिरीश नेरकर, जगन ताकटे, निखिल मोमया, चंदू बापू, गुलाब पाटील, नंदू येलमामे आदींनी आपल्या मतदारसंघातील संघटनेची माहिती सादर केली. धुळे जिल्ह्याचे निरीक्षक उमेश पाटील यांनी जिल्ह्यातील पक्षस्थिती आणि आगामी निवडणूक तयारीचा सविस्तर अहवाल दिला.
या बैठकीला निरीक्षक उमेश पाटील, रणजीत राजे भोसले, कामराज निकम, नरेंद्र तोरवणे, शशी भदाणे, जगन ताकटे, शकीला बक्ष, डॉ. शांताराम पाटील, अशोक धुळेकर तसेच तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, विविध आघाडी व सेल प्रमुख, ज्येष्ठ पदाधिकारी, युवक व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पक्षाने संघटित आणि प्रभावी लढ्याची तयारी सुरू केली आहे. गावपातळीपासून जिल्हा स्तरापर्यंत पक्षाचा विस्तार वाढवून मतदारांशी थेट संवाद साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
